Thursday 9 April 2015

आय. पी. एलचा हंगाम आणि हंगामा

वर्ल्ड कपचा हॅंग-ओव्हर आत्ता कुठे उतरला होता. सेमि-फायनल मधील आपला पराभव आणि त्यापाठोपाठ कोहली-अनुष्का यांच्या नावाचा उदो-उदो अजुनही ताजाच होता, तोपर्यंत पॅं, पॅं, पॅं, पप….पप…. पॅं, पॅं ची धुन आणि ऍड चालू झाली. क्रिकेट इज नेवर आउट ऑफ सिजन, वुई आर बॅक विथ आय. पी. एल. प्लेयर्सची बोली आणि निलामी होऊन नवे गडी आणि नवी टीम तयार झाली आहे. काही प्लेयर्स पळवले गेले, तर काहीजणांनी पॅकेज वाढवून दुसर्या टीममधे उडी मारली. मुंबई-इंडियन्स काय किंवा राजस्थान रॉयल्स काय, फरक काय पडणार आहे. वीस ओव्हर्समधे आपलं स्कील दाखवायचं, बस….


काही टीम्सचा बोल-बाला पहिल्याझुट पासूनच आहे. त्यापैकी चेन्नईची टीम पिवळ्या जर्सीत सर्वात पुढे. यावेळीही सी. एस. के. चा व्हिसल पोडू नेहमीप्रमाणेच दमदार आहे. मॅक्कुलम, धोनी, रैना, डी. स्मिथ, हसी, ब्रावो, डुप्लेसिस, ही तगडी मंडळी चेन्नई एक्स्प्रेस डोळे झाकून प्ले-ऑफ्सच्या स्टेशन पर्यंत घेऊन जातील.
मुंबई-इंडियन्सकडे रोहित शर्मा, पोलर्ड, कोरे एंडरसन, फिंच, असे पॉवर हिटर आहेत. पण हे प्लेयर्स आपल्याच धुंदीत खेळत असतात. इंग्लिशमधे त्याला “बंच ऑफ इंडिविजुयल्स” म्हणतात. या सर्व खेळाडूंना एकत्रीत जुंपणार्या लिडरचा अभाव आहे. मुंबईचं पारडं जड आहे ते मलिंगा, हॅजलवुड, हरभजन, मॅक्लेघन यांसारख्या नियंत्रीत पण आक्रमक मारा करणार्या बॉलर्समुळे.
राजस्थान रॉयल्सची टीम भारी वाटते राव. स्टिव्ह स्मिथ, फॉकनर, रहाणे, वॅट्सन, सॅम्सन, केन रिचर्डसन, जबरी प्लेयर्स यार! फक्त चार फॉरेन प्लेयर्सचं गणित जुळवून बॉलिंग डिपार्ट्मेंट क्रियेटिवली बॅलन्स करता आला पाहिजे. मग ही टीम कोणाशीही दोन हात करू शकेल.
के. के. आर.- यांच्याकडे स्टार प्लेयर्स जास्त नाहीत. यावेळची टीमही जरा आव्हरेजच वाटते. पण जे प्लेयर्स आहेत ते कॅप्टन गंभीरच्या निर्देशानुसार/ हुकुमानुसार कामगीरी बजावतात. त्यामुळेच तर मागच्या वर्षी पिछाडीवरून मुसंडी मारत त्यांनी टायटल उचललं.
किंग्ज एलेवनकडे सेहवाग, मिलर, मॅक्सवेल, बेले, मार्श, हे स्पेशालिस्ट आहेत. यांच्या रन्स होतील, पण जॉन्सन आणि परेरा सोडला तर बॉलिंग ही लंगडी बाजू वाटते. त्यामुळे ही टीम स्पर्धेतून मागे रेटली जाईल.
सन रायजर्सकडे यावेळी चांगले नावाजलेले प्लेयर्स आहेत. धवन, विल्यमसन, के.पी., वॉर्नर, मॉर्गॉन, स्टेन. इथेही प्रश्न तोच असेल, बॉलिंग युनिटची साखळी व्यवस्थीत गुंफणे.
डी. डी. आणि आर. सी. बी. यांच्या धन्यांनाच टीमकडून जास्त अपेक्षा नसतील. विराट, गेल आणि डिविलियर्स, संपली आर. सी. बी.ची टीम. ह्या तिघांची बॅटींग हेच यांचं भांडवल. बाकी या दोन टीम्सना जास्त स्कोप दिसत नाही. चांगला खेळ करा आणि पास होण्यापुरते मार्क्स मिळवा, एवढंच संघ मालक त्यांना सांगू शकतो.
मागच्याच महिन्यात ब्लू जर्सी घालून टीम इंडियाला चीयर करणारे फॅन्स आता निळ्या, पिवळ्या आणि लाल जर्सी मधे विभागून आय. पी. एल. ला चीयर करतील.