सन - १८८२. ठिकाण - ओव्हलचं मैदान. प्रतिस्पर्धी - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. इथूनच सुरुवात झाली होती त्या क्रिकेटच्या युद्धाला. चौथ्या इनिंग्जमधे अवघ्या ८५ रन्स काढायच्या होत्या. पण कदाचित वेगळा इतिहास घडायचा होता म्हणून... इंग्लंडच्या टीमनं ७५ धावांतच जीव सोडला. हा धक्का त्यावेळच्या शिष्ट (तसे ते अजूनही आहेत म्हणा) इंग्लिश फॅन्सना सहन नाही झाला. त्यांनी स्टंप्स, बेल्स जाळल्या आणि जाहीर केलं - "इंग्लंडचं क्रिकेट संपलं. या इथेच त्यांचा मृत्यू झाला. या अस्थी विसर्जित करा..."
या जाळलेल्या ‘अस्थी’, इंग्लंडच्या गंगेत - म्हणजे थेम्समधे - विसर्जित न करता एका चषकरूपी साच्यात भरण्यात आल्या. त्या चषकाचंच 'ॲशेस' हे नामकरण झालं. प्रत्येक सिरीजच्या वेळी, "वुई शाल ब्रिंग बॅक द ॲशेस!" ("आम्ही जिवाचं रान करू, पण या अस्थी परत आणू") अशा वल्गना दोन्ही टीम करायच्या. ॲशेसची ही लढाई दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची बनली. बदला आणि प्रतिबदला असं हे चक्र सतत घुमत राहिलं. याच ॲशेसच्या लढाईनं अनेक कथा, परीकथा, बदले की कहानी, राग, द्वेष यांना जन्म दिला.
१९३२ च्या 'बॉडीलाइन सिरीज'पासून तर या कट्टरपणात सतत वाढ होत गेली. जॉर्डीन-लारवूड या जोडीनं, कदाचित पहिल्यांदाच, क्रिकेट पिचला रक्ताची चव चाखवली. ‘व्हिक्टरी ॲट एनी कॉस्ट’ असं म्हणत जंटलमन लोकांचा हा गेम ‘जंटल’ नाही राहिला. पुढं अशा अनेक सिरीज झाल्या, ब्रॅडमॅनची ॲशेस, बोथमची १९८२, वॉर्नची १९९३-९४, मॅग्राथची १९९७, फ्लिंटॉफची २००५, आणि जॉन्सनची २०१३....
मनोरंजानासाठी आपण अनेक सिनेमे बघतो, अनेक गाणी ऐकतो. पण अस्सल अभिनयासाठी, चांगल्या कथेसाठी, आणि दर्जेदार गाण्यांसाठी किशोर, ए. आर. रहमान, अमिताभ बच्चन, नसिरूद्दीन शाह यांच्याकडं वळावंच लागतं. तसंच, नुसती ‘मॅच’च बघायची असेल तर आपण आय.पी.एल, ट्वेंटी-ट्वेंटी असं काहीही बघू शकतो, पण परिपूर्ण असं क्रिकेट पहायचं असेल, वाचायचं असेल, ऐकायचं असेल, तर मात्र 'ॲशेस'च पहावं, वाचावं, ऐकावं. त्याला अल्टरनेटीव्ह नाही. 'क्रिकेट बुक'मधले सर्व नियम आणि थियरी जर प्रात्यक्षिक रुपात समजावून घ्यायचे असतील, तर क्रिकेटप्रेमींनी ॲशेस सिरीज जरूर बघावी, जी सुरू होत आहे येत्या आठ जुलै पासून.
ऑस्ट्रेलियाचं ॲशेसभोवती पक्कं संरक्षक असं कवच आहे. जॉन्सन, हॅजलवूड, स्टार्क, सिडल यांचा तुफानी मारा, आणि ओपनिंगपासून शेवटपर्यंत असलेला जाड, मजबूत असा फलंदाजीचा थर. हे कवच भेदण्यासाठी लागणारी प्रचंड ताकद, आणि सोबत मानसिक शक्ती इंग्लंडकडं सध्या तरी दिसत नाही. फक्त होम-पिचवर सामने होणार आहेत, तेवढीच काय ती मिणमिणती आशा...
ऑस्ट्रेलियाच्या तावडीतून 'ॲशेस' सोडवून आणणं इंग्लंडला जमेल? की पुन्हा एकदा इंग्लिश क्रिकेटप्रेमींवर क्रिकेटचा मृत्यू पाहण्याची वेळ येईल? बघूया येत्या आठ जुलैपासून...