Saturday, 14 February 2015

वर्ल्ड कपचं वेड!

वर्ल्ड कपचं वेड!

"युवराज-सेहवाग शिवाय आपण वर्ल्ड कप जिंकणं अशक्य.
आपली बॉलिंग बकवास आहे.
(नाक मुरडून) फारतर सेमीपर्यंत जाऊ.
धोणीच्या मुलीचा पायगुण चांगला लागेल.
काहीतरी चमत्कार होईल आणि आपण हा वर्ल्ड कप जिंकू!
वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण पाकला हरवा.
बघ तू, अमुक टीमच जिंकणार.
नाही रे, ती टीम चोकर आहे, मधेच टायटाय फिस्स होणार.
जॉन्सन, स्टेन हे बॉलर्स वर्ल्ड कपमधे वादळ आणणार..."

फेसबुक, व्हॉट्स अॅपवरच्या या काही कॉमेंट्स! अखेर वर्ल्ड कप चालू झालं. सगळीकडं चहा, सिगारेटच्या टपरीवर, बारमधे, ऑफिसमधे, दोन महिने हा वर्ल्ड कप असाच दुमदुमणार आहे. दर चार वर्षांनी क्रिकेटचा दादा म्हणा, बादशाह म्हणा, इथंच ठरतो. अर्थातच, युद्धाद्वारेच! यंदाचा रणसंग्राम ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड यांच्या रणभुमीवर.

बादशाहत मिळवण्यासाठी पराक्रमी योद्धे आणि अत्युच्च दर्जाचा शस्त्रसाठा लागतो. सद्य परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्युझिलंड, आणि भारताकडं तो साठा आहे.

ऑस्ट्रेलियावर नजर टाकली तर, वॉर्नर, स्मिथ, फिंच, मॅक्सी, मार्श अशी त्यांची पराक्रमी टॉप आर्डर. सोबत फॉक्नर, हडीन यांसारखे अचानक हल्ला करणारे ‘एक्स’ फॅक्टर्स. इकडं बॉलिंगमधे, प्रतिपक्षाची फळी कापण्यासाठी जॉन्सन, स्टार्क, कमिन्स अशा धडाडत्या तोफा आहेत. फक्त स्पिन बॉलिंग हाच काय तो कच्चा दुवा. पण ती बाजू बाकीचे प्लेयर्स सांभाळून घेतील.

दक्षिण आफ्रिकेकडंही उत्कृष्ट दर्जाचं सैन्य आणि मिसाइल्स आहेत. आमला, डिकॉक, डुमिनी, यांपैकी कुणीतरी डाव सांभाळतोच. त्यानंतर डिविलीयर्स नावाचं चेटूक त्यांच्याकडं आहे, 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'मधल्या लेगोलस सारखं. अंगात वारं शिरलं की कुठूनही, कसाही, पण वर्मावर वार करणारा डिविलीयर्स. बाकी स्टेन, मॉर्कल, फिलेंडर यांची दहशत आहेच. पण यांचं घोडं अडतं एके ठिकाणीच - दैव! ऐन मोक्याच्या वेळी यांचं सैन्य किंवा शस्त्र निकामी होतं.

अनेकांनी न्युझिलंडवरही विश्वास दाखवला आहे. त्यांच्याकडंही पुरेसं पाठबळ आहे म्हणा. विल्यमसन, मॅक्युलम, तो नवखा राँकी, ऑल-राउंडर एँडरसन आणि टेलर. न्युझिलंडची बॉलिंगही उत्कृष्ट आहे. बोल्ट, मिल्ने, मॅक्लेघन यांसारखे तिखट बॉलर्स, सोबत ‘तरूण’ अनुभवी विट्टोरी आहेच स्पिन सांभाळायला. आणि त्यातून घरचा परिसर, त्यामुळं न्युझिलंडही ताकद पणाला लावणार. पण इतिहास असं सांगतो, की एका विशिष्ट पातळीपर्यंत ही टीम उचल घेते, पण फिनिशिंग टच यांना देता येत नाही. किवी पक्ष्याप्रमाणंच.

आता भारत... 'आम्ही वर्ल्डकप परत देणार नाही!' हे भारताचं वर्ल्ड कपसाठीचं ब्रीदवाक्य. इकडं खेळाडूंचं काँबिनेशन करतानाच नाकी नऊ यायला लागलेत. पण काय करणार, जीव जडलाय ना भारताच्या टीमवर. त्यामुळं कितीही खराब खेळले तरी भाबडी आशा आहे की आम्ही काही वर्ल्ड कप परत देणार नाही. कोहली, रहाणे, रोहीत, धोनी यांच्याकडं पराक्रम आहे. पण बॉलिंगचं अस्त्र निकामी झाल्यासारखं वाटतं. तिथं आपली टीम सुधारली तर काही संधी वाटते. पण मित्रांनो, सद्यस्थितीत आपली ताकद गनिमापेक्षा कमी आहे. आपण खिंडीपर्यंत जाऊ शकतो. तिथं खिंड लढवणार्‍या योद्ध्यांनी अत्त्युच्च पराक्रम दाखवला, तर आपला वर्ल्ड कप सुरक्षित राहील. नाहीतर गनिम संधी साधून जाईल. आणि हो, पूनम पांडेनं यावेळीही वचन दिल्याचं मी असंच कुठंतरी ऐकलंय... भारतानं वर्ल्ड कप जिंकला की ती (जेवढे आहेत तेवढे) कपडे काढणार आहे म्हणे. तशी सनी लियोनही काही मागं नाही. तिनं म्हणे जाहीर केलंय की, भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर सर्व सिनेमांमधे (काही ‘विशिष्ट’ सिनेमे सोडून) ती साडी आणि हातभर ब्लाऊज घालून ‘ऍक्टिंग’ करणार आहे! खरं-खोटं देव जाणे!

बाकी पाक, लंका, वेस्ट इंडीज, इंग्लंड, यांच्यापैकी इंग्लंड आणि लंका थोडीफार उचल घेतील, पण चँपियन बनण्याची कुवत त्यांच्यात फारशी दिसत नाही. यु.ए.ई., झिम्बांब्वे, बांग्लादेश, वगैरे देश 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' असेच आहेत. (एखादा अपसेट रिझल्ट लागेलही म्हणा...) काहीही असो, नेहमीप्रमाणेच हा वर्ल्ड कपही जबरी होणार यात शंका नाही. आपापल्या देशासाठी काही लोक देव पाण्यात ठेवतील, काही लोक अल्लाकडं दुवा मागतील, काहीजण जिझसला प्रे करतील. मॅचच्या दरम्यान शिव्याही येतील आणि कौतुकही होईल. कंठ दाटून येईल... पदरी निराशाही येईल. येस्स!!! असा आनंदोद्गारही निघेल. फटाके फुटतील... कदाचित काही टी. व्ही सेटही फुटतील. काही लोक आम्हाला वेडे म्हणून हिणवतील. आम्ही तयार आहोत क्रिकेटचं हे वेडेपण स्विकारायला. शेवटी हा वर्ल्ड कप आहे राव! चार वर्षांतून एकदाच येतो. आमच्यासाठी हाच शिमगा, हाच दसरा, आणि हीच दिवाळी!

No comments:

Post a Comment