Sunday, 7 September 2014

"इ बारभी टेस्ट सिरीज ज़ितेकी रही..."


लॉर्डसच्या हिरव्यागार पीचवर इंग्लंडला मात दिल्यानंतर आम्हा क्रिकेटप्रेमींना स्वप्नं पडू लागली होती; आता इंग्लंडमधे आपला झेंडा फडकणार. ईशांत, शामी, वरुण आरून, भुवी, जडेजा इंग्लंड फलंदाजावर हल्लाबोल करणार. कोहली, पुजारा, विजय, रहाणे, धोणी इंग्लंड बॉलर्सचा टिच्चून सामना करणार. पण जेव्हा हे ढग, आता विजयाचा पाऊस पाडणार असे वाटत असताना हवेतच विरुन गेले, तेव्हा लगानचे काही डायलॉग आठवले - "बखतसे पहिले खुशियां..." आणि "इ बार भी टेस्ट सिरीज जितेकी रहीं."

विदेश दौर्‍यागणिक दौरे जाताहेत, अनुभवाची (पराभवाची) शिदोरी बळकट होतेय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण अपयशाच्या या पायर्‍या संपता संपत नाहियेत. सिरिज संपल्यानंतर धोनीचे तेच-तेच स्पष्टीकरण - "आम्ही चांगला खेळ केला, पण आमच्या खेळाडूंना या वातावरणात खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे काही (त्याच-त्याच) चुका झाल्या. या अनुभवाच्या आधारे आम्ही पुढच्यावेळी चांगली कामगिरी करू."

त्यात रवी शास्त्रीने अगदी प्रेमाने समजूत घातली. आपली पोरं अजून कोवळी आहेत, अशा वातावरणात जुळवून घेणे जरा अवघड असते, आपली ताकद वन-डे आणि २०-२० आहे. हे काय जस्टिफिकेशन आहे! (त्याचं बक्षीसही त्यांना मिळालं म्हणा.)

९४, १४८, १५२, १७८ हे आपले मागल्या कसोटीतील स्कोर आहेत.
अरे, तिकडे झिंबाब्वे दोन वेळचं मानधन कसं-बसं मिळवून डेल स्टेन, मॉर्कल यांचा सामना करीत ९० ओव्हर खेळून काढतात. आणि इथं सर्व सुख-सुविधा, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, मुख्य कोच असूनही आपल्याला पन्नास ओव्हरही खेळणं जीवावर येतं!

आजही दर्दी क्रिकेट चाहता टेस्ट क्रिकेट आवर्जून बघतो. कारण टेस्ट क्रिकेटमधेच बॉलर बॅट्समनला जाब विचारू शकतो. स्विंग आणि सीम होणार्‍या पीचवर बॅट्समनला नाचवू शकतो. याचा सामना करुन जो बॅट्समन रन्स काढतो त्या रन्सची आणि खेळीची गोडी आणि आत्मियता काही वेगळीच असते...

पण आपल्याला चटक लागली आहे, फक्त वीस-तीस ओव्हर्स खेळून पन्नास-साठ रन्स काढायची. ही सवय म्हणजे जित्याची खोड झाली आहे आता.



इंग्लड विरुद्धच्या या टेस्ट मॅचेसमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. पीचवर नांगर टाकून, संयम दाखवत हळूहळू रन्स जमा करायची तसदी भारतीय फलंदाजांना नकोय. बॉल कसा स्विंग होतोय, पीचवर पडल्यानंतर कुठे मूव्ह होतोय, स्विंग कसा कव्हर करायचा, कुठला बॉल ड्राइव्ह करायचा, नवीन बॉलवर सुरुवातीला बॅट शरीराच्या जास्तीत जास्त जवळ ठेवून डिफेन्सिव शॉट कसा खेळायचा, या गोष्टींचा विचार करताना जास्त कुणी दिसलंच नाही. बॉल पुढं दिसला की मार ड्राईव्ह. तुम्ही नेटमधे कितीही सराव करा, कोच तुम्हाला कितीही टिप्स देऊ दे, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष खेळपट्टीवर राहून सराव केलेल्या गोष्टी अंमलात आणत नाही, त्या मेंटल ब्लॉकमधून बाहेर येत नाही, तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे...

आता या सर्व गोष्टी फक्त या सिरीजमधे घडल्या आहेत असं नाही. २०११ पासून १४-१५ टेस्टमधे हेच घडत आलंय.

बरं, ॲन्डरसन, ब्रॉड हे काही बॉलला मंतरलेले धागे-दोरे बांधून बॉलिंग करत नव्हते. इंग्लंडमधे नवीन बॉल, हिरवं पीच, ढगाळ हवामान अशा वातावरणात बॉल स्विंग होणारच. सिमवर पडून कधी आत आणि कधी बाहेर मूव्हमेंट होणारच. अशा गोष्टी हाताळण्यातच तर खरं स्किल असतं. त्यासाठीच तर एवढ्या सगळ्या खेळाडूंमधून अकरा बेस्ट खेळाडू निवडले जातात...

पण जर चॅलेंज स्विकारायचं जिगरच नसेल, गल्ली क्रिकेट खेळण्यातच हे खेळाडू धन्यता मानत असतील, तर वर्षानुवर्षे परदेशात असेच पराभव होत राहतील. आणि प्रत्येक वेळेला राग अनावर होऊन क्रिकेटप्रेमींना सनी देओलचा ड़ायलॉग म्हणावा लागेल -

सिरीजपे सिरीज, सिरीजपे सिरीज, सिरीजपे सिरीज निकलती जा रही है, लेकिन जीत नहीं मिल रही! :-(


No comments:

Post a Comment