Sunday, 7 September 2014

प्रिय विराट.......



प्रिय विराट.......
                                        
प्रिय विराट,

मित्रा कसा आहेस? काही नाही रे, म्हटलं सहज चौकशी करावी, इंग्लंडमधे 'ऑल क्लियर' आहे ना? कारण इंग्लंडमधे गेल्यापासून तू जरा 'थंड-थंड' वाटतोयस. दोन टेस्ट झाल्या, नेहमी तुझी गाडी एका 'किक'मधे स्टार्ट होते आणि सुसाट वेगात झीरो टू हन्ड्रेड क्रॉस करते; पण इथे तुझी गाडी स्टार्टच होत नाहीये. फिल्ड करतानापण बॉडी लँग्वेजही थोडी सॉफ्ट वाटतीये. ते एग्रेशन, पॅशन मंदावल्यासारखं जाणवतंय.

नाही, लोक कुजबुजतायत अनुष्का आणि तुझ्या अफेयरबद्दल. अशी चर्चा चालू आहे की, त्या नकछडीच्या सान्निध्याने तुझ्या बॅटिंगला ब्रेक लागलाय. हरी ओम!

मित्रा, थोडं सांभाळून! भले-भले खेळाडू या बॉलिवूड ग्लॅमरच्या मोहजालात कोळ्याच्या जाळ्यात अडकावे त्याप्रमाणे अलगद अडकलेत. याला विदेशी खेळाडूही अपवाद नाहीत. आणि त्याचे काय परिणाम झालेत, याविषयी तू पुरेपूर जाणतोस. सोबर्स - अंजू महेंद्रू, विव्ह रिचर्ड्स - नीना गुप्ता, रवी शास्त्री - अमृता सिंग ही रेट्रो काळातली अफेयर्स. पैकी विदेशी खेळाडूंचं राहूदे रे! त्यांची लाइफ-स्टाईलच अशी आहे - खा, प्या, खेळा, मजा करा, आणि 'सोडून' द्या. ते जास्त मनाला लावून घेत नाहीत. आपला पिंड तसा नाही राजा; आपण विचलीत होतो. अझरचंच उदाहरण घे! ९०च्या दशकात संगीता बिजलानीच्या पुंगीने अशी भुरळ घातली की, अझर स्मृतीभ्रंश झालेल्या रोग्यासारखा वाटत होता. स्क्वेयर कट आणि फ्लिक हे आपले पाळलेले शॉट आहेत हेच तो विसरला होता. लांब कशाला, युवराज - दीपिका आणि धोनी - दीपिका हा डबल-बार कसा होता! २००७ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात युवराजला नामी संधी होती, टेस्ट टीममधे जम बसवण्याची. धोनीनं दीपिकामधून अलगद अंग काढून घेतलं, पण युवराज मात्र दीपिकाच्या मागं फरफटत गेला आणि परत टेस्ट टीममधे कधीही जम नाही बसवू शकला. गांगुलीही नगमासोबत थोडा भरकटत होता, पण वेळीच सावरला. अशा या कथा आणि व्यथा, क्रिकेट - बॉलिवूड अफेयर्सच्या.

क्रिकेट फार अजब खेळ आहे बाबा! इथं फॉर्म आणि फुटवर्क एकदा लडबडलं की सगळंच बिघडतं. मान्य आहे तू तरुण आहेस, थोडंफार अट्रॅक्शन असणार. पण हे विसरू नकोस - तू एक धाकड, हाय-कॅलिबर आणि निडर बॅट्समन आहेस. टीमची कमान बर्‍याच अंशी तुझ्यावर अवलंबून आहे. येणार्‍या काळात इंडीयन टीमचा कॅप्टनही होशील. या तारकांचं काय, खोबरं तिकडं चांगभलं. त्यामुळं भावा, अशा प्रलोभनानं आपलं लक्ष विचलीत होऊ देवू नकोस.



जोपर्यंत स्कोअरची 'भरती' आहे तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा 'ओहोटी' चालू झाली, की एक्स्पर्ट्सची करडी कठोर नजर प्रत्येक बारीक गोष्टींचा कीस काढायला तयार असते. मग तुझं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कमी पडतंय, डावा पाय बॉलच्या रेषेत येत नाही, तो जरा शॉट शरीरापासून दूर खेळतोय, बॅट-पॅडमधे गॅप जास्त राहतेय; असे एक ना अनेक (भले ते नसले तरी) उणे-दुणे काढले जातात.

त्यामुळं कोल्हापुरी श्टाइलमधे सांगतो भावा, आपण भलं, आपलं क्रिकेट भलं. 'आपला एकच पक्ष, क्रिकेटवर लक्ष' एवढंच लक्षात ठेव!

No comments:

Post a Comment