Sunday, 5 October 2014

बॉलर्स; दुर्दैवाचे धनी!

स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्कुप, स्वीच हिट... क्रिकेटची जस-जशी उत्क्रांती होत गेली, तस-तशी खेळाडूंनी अशी अनेक इनोव्हेशन्स केली. (क्रिकेटमधे पेटंट हा प्रकार अजून आलेला नाही. त्यामुळे अमुक एक शॉट तमुक एका खेळाडूच्या परवानगीशिवाय खेळला जाऊ शकणार नाही, हा नियम अजुनतरी लागू झालेला नाही.) बॅट्समनसाठी तशी फारशी बंधनं नाहीत. कुणीही कुठलाही शॉट क्रियेटीव्हली कसाही खेळू शकतो. इकडे बॉलर्सकडे फारसे पर्याय नाहीत. वंशपरंपरागत चालत आलेली तीच ती आउट-स्विंग, इन-स्विंग, कटर, लेग-कटर अशी आयुधे. बॉलर जर तगडा असेल तर बॅट्समनला घाबरवण्यासाठी बाउंसर नावाचा तोफगोळा. स्पिन बॉलर्सची अवस्था तर मध्यमवर्गीय कुटुंबासारखी. लेग-स्पिनर असेल तर लेग-स्पिन, गुगली, फार-फार तर फ्लिपर. ऑफ-स्पिनर त्याहीपेक्षा मर्यादीत, बॅट्समनसाठी ती मेजवानीच असते. बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

काही बॉलर्सनी थोडेफार इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्व वादग्रस्तच ठरले. या इनोव्हेशनचा श्रीगणेशा केला इम्रान खान याने. रिव्हर्स-स्विंगला तिखटपणा आणण्यासाठी त्याने नखे आणि टोपणाचा वापर करुन सीम कुरतडण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे बॉल कधी खाली रहायचा तर कधी झप्पकन बाउंस व्हायचा. काही महाभागांनी तर बॉलची शाइन आणि स्विंग टिकवण्यासाठी व्हॅसलीनचा वापर केला होता. ही इनोव्हेशन्स तशी बेकायदेशीरच होती. खरे इनोव्हेशन आणले ते सकलेन नामक बॉलरने. ऑफ-स्पिन बॉलिंगला नवसंजीवनी देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नेहमीच्या ऑफ-स्पिनसोबत एक बाहेर वळणारा बॉल त्याने विकसीत केला आणि त्याला नाव दिलं 'दुसरा'. ज्या टप्प्यावरुन तो ऑफ-स्पिन टाकायचा त्याच टप्प्यावरुन बेमालुमपणे 'दुसरा' वळवायचा. 'दुसरा' हा सकलेनच्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे होता.

नवीन काही आले की लगेच त्याची कॉपी सुरु होते. 'दुसरा'पण त्याला अपवाद नव्हता. अनेकांनी या 'दुसर्‍या'साठी प्रयत्न केले. आणि इथेच परत दुर्दैव आडवे आले. या 'दुसर्‍या'पायी आय.सी.सी.चा ससेमिरा स्पिन बॉलर्सच्या मागे लागला. राजेश चौहान, हरभजन, मुरलीधरन, सम्युअल्स, शोएब मलिक, या सर्वांना बॉलिंग एक्शनसाठी बायो-मेकॅनिक्सच्या एक्स-रेमधून जावे लागले. राजेश चौहानला तर कपडे काढून तासन्‌तास नेटमधे बॉलिंग करायला लावलं होतं. मुरलीधरनला तर आयुष्यभर संशयाच्या नजरेखालीच बॉलिंग करावी लागली.

आता परत दोन गुणी बॉलर्स संशयाच्या भोवर्‍यात सापडलेत. अजमल आणि सुनिल नरायन (कुणी नरीन म्हणतं). अजमल बॉलला फ्लाईट देऊन 'दुसर्‍यामधे' बॅट्समनला अडकवतो, तर नरीनचा 'मिस्टरी बॉल' डोळ्याला दुर्बीण लावूनही ओळखता येत नाही. पण आय.सी.सी.ला हेही बघवले नाही. दोघांचीही रवानगी (बॉलिंग) सुधारगृहात करण्यात आली आहे. नियमावलीनुसार, बॉलिंग करताना हाताचा कोपरा १५ अंशापेक्षा जास्त वळता कामा नये. अजमल आणि नरीनचा हात अनुक्रमे ४० आणि २२ अंशाने वळतो. हे थोडेसे जास्त आहे. पण तरीही रमीज राजा यांच्या म्हणण्यानुसार खरे तर नियमावलीत थोडी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. आधीच बॉलर्स म्हणजे रंजली गांजलेली प्रजाती आहे. त्यांच्या पदरी नेहमी अवहेलनाच आल्या आहेत. त्यांना थोडीशी तरी सवलत मिळायला हवी. बॅट्समनचाही जरा कस लागू दे. आणि तसेही क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समनचा मुकाबला बघण्यातच मजा असते ना राव!

No comments:

Post a Comment