Saturday, 14 February 2015

वर्ल्ड कपचं वेड!

वर्ल्ड कपचं वेड!

"युवराज-सेहवाग शिवाय आपण वर्ल्ड कप जिंकणं अशक्य.
आपली बॉलिंग बकवास आहे.
(नाक मुरडून) फारतर सेमीपर्यंत जाऊ.
धोणीच्या मुलीचा पायगुण चांगला लागेल.
काहीतरी चमत्कार होईल आणि आपण हा वर्ल्ड कप जिंकू!
वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण पाकला हरवा.
बघ तू, अमुक टीमच जिंकणार.
नाही रे, ती टीम चोकर आहे, मधेच टायटाय फिस्स होणार.
जॉन्सन, स्टेन हे बॉलर्स वर्ल्ड कपमधे वादळ आणणार..."

फेसबुक, व्हॉट्स अॅपवरच्या या काही कॉमेंट्स! अखेर वर्ल्ड कप चालू झालं. सगळीकडं चहा, सिगारेटच्या टपरीवर, बारमधे, ऑफिसमधे, दोन महिने हा वर्ल्ड कप असाच दुमदुमणार आहे. दर चार वर्षांनी क्रिकेटचा दादा म्हणा, बादशाह म्हणा, इथंच ठरतो. अर्थातच, युद्धाद्वारेच! यंदाचा रणसंग्राम ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड यांच्या रणभुमीवर.

बादशाहत मिळवण्यासाठी पराक्रमी योद्धे आणि अत्युच्च दर्जाचा शस्त्रसाठा लागतो. सद्य परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्युझिलंड, आणि भारताकडं तो साठा आहे.

ऑस्ट्रेलियावर नजर टाकली तर, वॉर्नर, स्मिथ, फिंच, मॅक्सी, मार्श अशी त्यांची पराक्रमी टॉप आर्डर. सोबत फॉक्नर, हडीन यांसारखे अचानक हल्ला करणारे ‘एक्स’ फॅक्टर्स. इकडं बॉलिंगमधे, प्रतिपक्षाची फळी कापण्यासाठी जॉन्सन, स्टार्क, कमिन्स अशा धडाडत्या तोफा आहेत. फक्त स्पिन बॉलिंग हाच काय तो कच्चा दुवा. पण ती बाजू बाकीचे प्लेयर्स सांभाळून घेतील.

दक्षिण आफ्रिकेकडंही उत्कृष्ट दर्जाचं सैन्य आणि मिसाइल्स आहेत. आमला, डिकॉक, डुमिनी, यांपैकी कुणीतरी डाव सांभाळतोच. त्यानंतर डिविलीयर्स नावाचं चेटूक त्यांच्याकडं आहे, 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'मधल्या लेगोलस सारखं. अंगात वारं शिरलं की कुठूनही, कसाही, पण वर्मावर वार करणारा डिविलीयर्स. बाकी स्टेन, मॉर्कल, फिलेंडर यांची दहशत आहेच. पण यांचं घोडं अडतं एके ठिकाणीच - दैव! ऐन मोक्याच्या वेळी यांचं सैन्य किंवा शस्त्र निकामी होतं.

अनेकांनी न्युझिलंडवरही विश्वास दाखवला आहे. त्यांच्याकडंही पुरेसं पाठबळ आहे म्हणा. विल्यमसन, मॅक्युलम, तो नवखा राँकी, ऑल-राउंडर एँडरसन आणि टेलर. न्युझिलंडची बॉलिंगही उत्कृष्ट आहे. बोल्ट, मिल्ने, मॅक्लेघन यांसारखे तिखट बॉलर्स, सोबत ‘तरूण’ अनुभवी विट्टोरी आहेच स्पिन सांभाळायला. आणि त्यातून घरचा परिसर, त्यामुळं न्युझिलंडही ताकद पणाला लावणार. पण इतिहास असं सांगतो, की एका विशिष्ट पातळीपर्यंत ही टीम उचल घेते, पण फिनिशिंग टच यांना देता येत नाही. किवी पक्ष्याप्रमाणंच.

आता भारत... 'आम्ही वर्ल्डकप परत देणार नाही!' हे भारताचं वर्ल्ड कपसाठीचं ब्रीदवाक्य. इकडं खेळाडूंचं काँबिनेशन करतानाच नाकी नऊ यायला लागलेत. पण काय करणार, जीव जडलाय ना भारताच्या टीमवर. त्यामुळं कितीही खराब खेळले तरी भाबडी आशा आहे की आम्ही काही वर्ल्ड कप परत देणार नाही. कोहली, रहाणे, रोहीत, धोनी यांच्याकडं पराक्रम आहे. पण बॉलिंगचं अस्त्र निकामी झाल्यासारखं वाटतं. तिथं आपली टीम सुधारली तर काही संधी वाटते. पण मित्रांनो, सद्यस्थितीत आपली ताकद गनिमापेक्षा कमी आहे. आपण खिंडीपर्यंत जाऊ शकतो. तिथं खिंड लढवणार्‍या योद्ध्यांनी अत्त्युच्च पराक्रम दाखवला, तर आपला वर्ल्ड कप सुरक्षित राहील. नाहीतर गनिम संधी साधून जाईल. आणि हो, पूनम पांडेनं यावेळीही वचन दिल्याचं मी असंच कुठंतरी ऐकलंय... भारतानं वर्ल्ड कप जिंकला की ती (जेवढे आहेत तेवढे) कपडे काढणार आहे म्हणे. तशी सनी लियोनही काही मागं नाही. तिनं म्हणे जाहीर केलंय की, भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर सर्व सिनेमांमधे (काही ‘विशिष्ट’ सिनेमे सोडून) ती साडी आणि हातभर ब्लाऊज घालून ‘ऍक्टिंग’ करणार आहे! खरं-खोटं देव जाणे!

बाकी पाक, लंका, वेस्ट इंडीज, इंग्लंड, यांच्यापैकी इंग्लंड आणि लंका थोडीफार उचल घेतील, पण चँपियन बनण्याची कुवत त्यांच्यात फारशी दिसत नाही. यु.ए.ई., झिम्बांब्वे, बांग्लादेश, वगैरे देश 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' असेच आहेत. (एखादा अपसेट रिझल्ट लागेलही म्हणा...) काहीही असो, नेहमीप्रमाणेच हा वर्ल्ड कपही जबरी होणार यात शंका नाही. आपापल्या देशासाठी काही लोक देव पाण्यात ठेवतील, काही लोक अल्लाकडं दुवा मागतील, काहीजण जिझसला प्रे करतील. मॅचच्या दरम्यान शिव्याही येतील आणि कौतुकही होईल. कंठ दाटून येईल... पदरी निराशाही येईल. येस्स!!! असा आनंदोद्गारही निघेल. फटाके फुटतील... कदाचित काही टी. व्ही सेटही फुटतील. काही लोक आम्हाला वेडे म्हणून हिणवतील. आम्ही तयार आहोत क्रिकेटचं हे वेडेपण स्विकारायला. शेवटी हा वर्ल्ड कप आहे राव! चार वर्षांतून एकदाच येतो. आमच्यासाठी हाच शिमगा, हाच दसरा, आणि हीच दिवाळी!

Thursday, 4 December 2014

The Hot Test!


First of all a tribute to Philip Hughes.

We are on a dangerous territory named Australia. This territory is abundant with wild and poisonous creatures. viz.-Crocodiles, red-back spiders, sharks in the jungle. And deadly Johnson, Pattinson, Siddle, Starc, Harris on the cricket field. These fiery and aggressive species spit venoms of bouncers, have sharp teeth of in and out cutters, and sting of sledging. Our not-so-experienced chaps would be surrounded by these wild and poisonous creatures, on the cricket field. When we retrospect/look back, it is evident that Australian team does not let the visiting team breath easily. Their fiery fast bowlers keep attacking relentlessly with the intent of making thrust in the batting order. In the last Ashes series, we have witnessed vandalism of England team by that fear factor, especially by Johnson's juggernaut.
On the Australian soil our sole best performance in the test, where we squared the series 1-1, was in the year 2004. We had successfully confronted the mighty Australian team, led by Steve Waugh, mainly due to fab-four's magnificant batting display under Ganguly's leadership. Sweet, but that is the past. We have also experienced bitter taste down under in the disastrous series of 2011. Sadly, since then our performance in test matches abroad has descended from worse to worst.
Our sustainability in the longer version of the game is already under scanner. Pujara, Kohli, Dhawan, all have failed miserably in the recently concluded series in England. The recent performance of our top order batsmen indicates that they have been under the phobia of pace bowling and dark green wicket. How could Australia let go this ideal scenario! They would be desperate and in attacking stance for the vengeance of the last series played in India, which they unexpectedly lost by 4-0. Glenn Macgrath and Siddle have already ignited the war of words by predicting India's whitewash.
But, if India manage their resources and energy with some cunning ploy, they could show a better performance. On Gaba, Brisbane, known for its green wicket and uncertain weather, pace battery of Varoon Aaroon, Umesh and Ishant can be utilised with optimum effect. On Adelaide and Sydney, which show some affinity for spinners, our inherant weapon, spin bowling may give us some hope. One thing India has to keep in mind,
under any circumstances 'attacking strategy' is the best option against Australia in Australia . But the question is- how Dhoni will handle the procedings? If he continues with his stale and defensive tactics.














द हॉट टेस्ट!

प्रथम ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजेसला भावपूर्ण श्रद्धांजली!

ऑस्ट्रेलिया - तसा हिंसक पशूंसाठी फार प्रसिद्ध. मोठ्याल्या मगरी, विषारी कोळी, अरे हो, शार्कसुद्धा. ह्या सगळ्याच आक्रमक प्रजाती.. बहुदा यांचेच गुण ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी उचललेत. जॉन्सन, पॅटिन्सन, स्टार्क, सिडल, हॅरिस हे सगळेच धष्टपुष्ट आणि ताडामाडासारखे उंच बॉलर्स. तुफानी स्पीड, १४५ च्या वर. घाबरवण्यासाठी बाउंसर, आणि सोबत स्लेजिंगचा (शिव्या देण्यासाठी वापरलेले गोंडस नाव) भडिमार. आता यांच्यासमोर आपले, नुकतेच इंग्लंड दौर्‍यातून शरणागती पत्करून आलेले, वीर रडणार...सॉरी, लढणार आहेत. मागच्या भारत दौर्‍यात ऑस्ट्रेलियाने ४-० असा अनपेक्षित मार खाल्ला होता. त्यामुळे त्या पराभवाची जखम भरून काढण्यासाठी त्यांची फौज नक्कीच आसुसलेली असणार.

आता ऑस्ट्रेलियाला गेल्यावर तिथे काही आपलं टिळा लावुन स्वागत होत नाही. तिथं विमान लँड व्हायचा अवकाश, की लगेच टक्के-टोणपे चालू होतात. दौरा सुरू होण्याआधीच प्रतिस्पर्धी संघाला कसं घाबरवायचं याचा प्लॅन तयार असतो. त्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंटच असतं. "तयार रहा, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ४-० ने मार खाणार," वेल-कम टू ऑस्ट्रेलिया. इति ग्लेन मॅग्राथ. सिडलनेही कोहलीला प्रेक्षकांचे भय दाखवले आहे. बाकिची कसर मिडियावाले भरून काढतात किंवा काढतील.

ऑस्ट्रेलियासाठी निम्मे काम तर त्यांचे बॉलर्सच करतात. ते प्रतिस्पर्ध्याला कधीच जम बसवू देत नाहीत. मागच्या ऍशेस सिरिजमधे इंग्लंड टीमच्या अनेक खेळाडूंना जॉन्सनच्या बाउंसर्सने शेकून काढले होते. त्यातच आपला इंग्लंड दौर्‍याचा अनुभव ताजा आहेच. कोहली, पुजारा, धवन यासकट सर्वच खेळाडूंना आपली ऑफ-स्टंप नक्की कुठे आहे, हे समजण्यातच दौरा संपला. सध्या आपल्या खेळाडूंची विकेट बॉलर्सपेक्षा धसक्यानेच जास्त जाते. ते पुर्वी होतं ना, मुघलांच्या घोडयांना संताजी आणि धनाजी हे पाण्यातही दिसायचे. आणि त्या पाण्यालाही ते जसे घाबरत होते, तशीच अवस्था काही प्रमाणात भारतीय फलंदाजांची झाली आहे. खेळपट्टीवर हिरवळ, आणि फास्ट स्विंग होत असलेला बॉल पाहिला की भारतीय फलंदाज बिथरतात. तीच गत या दौर्‍यातही राहिली तर हा दौरासुद्धा, डोक्यापासून टाचेपर्यंत, कठीण आहे!

मग पर्याय काय, जर मालिकेत चांगलं प्रदर्शन करावयाचे असेल तर? थोडे मेंदूला कष्ट द्यावे लागणार आणि अभ्यास करावा लागणार. दोन सामने आहेत अनुक्रमे ब्रिस्बेन आणि मेलबर्नवर, फास्ट बॉलर्सशी सलगी करणारे पिच. आपल्याकडे वरून आरून, इशांत, आणि उमेश यादव यांच्यासारखे फास्ट बॉलर्स आहेत. जर ब्रिस्बेनवर चार फास्ट बॉलर्स खेळवून थोडी आक्रमकता दाखवली आणि तो सामना अनिर्णित राखता आला, तर त्याचा फायदा ऍडलेड आणि सिडनेवर होईल. कारण, एक तर इथल्या विकेट्स स्पिन बॉलर्सना थोडी 'लाईन' देतात, आणि इतर ठिकाणांपेक्षा आपली इथली कामगिरी तुलनात्मकदृष्टया चांगली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करायची असेल, तर आक्रमक डावपेच हाच सर्वोत्तम उपाय आहे. जरासा ढिलेपणा दाखवला आणि अतिबचावात्मक पवित्रा घेतला तर जो काही 'डिफरन्स' राहतो, त्याचाच उपयोग ऑस्ट्रेलिया मॅच जिंकण्यासाठी करतो. आणि हाच 'डिफरन्स' गेल्या कित्येक मालिकेत आपल्याला 'लई भारी' पडलेला आहे. त्यामुळे धोनी कशी रणनीती आखतो आणि त्याची अंमलबजावणी करतो, यावरच मालिकेतील यश (किंवा 'पराभवाची' तीव्रता) अवलंबून असेल!

Friday, 7 November 2014

प्लेइंग इट माय वे, कॉन्ट्रावर्शियली!

राजकारण आणि स्पोर्ट्स, ही दोन अशी क्षेत्रं आहेत जिथं 'कॉन्ट्रावर्सी' हा अविभाज्य घटक असतो. तिथं कॉन्ट्रावर्सी नसणं हीच मोठी कॉन्ट्रावर्सी असू शकते. सध्या अशीच एक 'कॉन्ट्रावर्सी' गाजतेय क्रिकेटमधे, सचिनच्या आत्मचरित्रावरून. सचिन नावाच्या महापराक्रमी योद्ध्यानं क्रिकेट कारकीर्दीमधले आपले अनुभव - बरे आणि वाईट, स्वतःच्या आत्मचरित्रात उतरवले. सचिनची क्रिकेटमधील तेवीस वर्षांची कारकीर्द, तीही भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात! त्यामुळं त्याचं आत्मचरित्र हे त्याच्या बॅटिंगसारखंच खणखणीत असणार, यात काही शंका नव्हती. पण वादविवादापासून नेहमीच दूर राहणार्‍या सचिननं ग्रेग चॅपल नावाचं एक 'वादग्रस्त चॅप्टर' त्यात टाकून वादळ निर्माण केलं. या चॅप्टरमधे चॅपलचा 'चाप्टरपणा', त्याची फुटीरतावादी वर्तणुक, आणि त्याची कार्यशैली कशी संशयी होती, हे सचिननं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. अनेकांना हे खटकलं. पण सचिन काही पहिला खेळाडू नाही ज्यानं आपल्या पुस्तकात कटू, पण सत्य अनुभव कथन केले आहेत. हसी, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न, आणि झालंच तर शोएब अख्तर, पिटर्सन या सर्वांनीच या ना त्या प्रकारे असे अनुभव मांडले आहेत. बरं, सचिननं जर एखादा अनुभव सांगितला असेल आणि तोही पुस्तकाद्वारे, तर त्याच्या क्रेडिबिलिटीवर शंका घेण्याचं काहीच कारण नाही. त्याच्या शॉटप्रमाणेच त्याचे विचारही 'क्लिन' असतात. भले ग्रेग चॅपलनं या आरोपांचा साळसूदपणे इन्कार केला असेल, पण चॅपेल किती विश्वासार्ह आणि (अव)गुणी आहे, हे ऑस्ट्रेलियासकट सर्वांना माहित आहेच!

काहींनी शंका उपस्थित केली की, हा वाद-प्रपंच आत्ताच का? या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? पुस्तक खपवायचं हे 'मार्केटिंग' आहे का? वगैरे, वगैरे. एक तर सचिनला असल्या 'चीप' मार्केटिंगची गरज नाही. दुसरं म्हणजे क्रिकेटमधे काही एटिकेट्स बाळगायचे असतात. क्रिकेट खेळत असताना अशा 'गुज-गोष्टींची' वाच्यता ड्रेसिंग-रुमच्या बाहेर करायची नसते. त्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात. जेवढं शक्य आहे तेवढं वादळ कपातच शांत ठेवायचं असतं. नाही तर टीम आणि खेळाडूची कारकीर्द विस्कटायला वेळ लागत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इंग्लंडचा केविन पिटर्सन, आपला मनोज प्रभाकर, आणि सिद्धू!

क्रिकेट खेळणं हे लढाईसारखंच असतं. लढाई लढताना, जिंकताना, हरताना जितके वार केले जातात तितकेच, किंबहुना जास्तच झेलावेही लागतात. त्या जखमांच्या खाणाखुणा शरीरासोबत मनावरही उमटत असतात. सतत मैदान गाजवत असताना मनावरील या जखमा, कटू आणि वेदनादायक अनुभव खोल कुठंतरी दबून राहतात, नव्हे ते दाबून ठेवावे लागतात. पण शस्त्रं खाली ठेवल्यानंतर मनातल्या या जखमांचा भार, ते अनुभव कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर येतातच! सचिननं तो भार 'प्लेइंग इट माय वे' द्वारे शब्दरुपानं पानांवर उतरवला इतकंच.

Sunday, 5 October 2014

बॉलर्स; दुर्दैवाचे धनी!

स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्कुप, स्वीच हिट... क्रिकेटची जस-जशी उत्क्रांती होत गेली, तस-तशी खेळाडूंनी अशी अनेक इनोव्हेशन्स केली. (क्रिकेटमधे पेटंट हा प्रकार अजून आलेला नाही. त्यामुळे अमुक एक शॉट तमुक एका खेळाडूच्या परवानगीशिवाय खेळला जाऊ शकणार नाही, हा नियम अजुनतरी लागू झालेला नाही.) बॅट्समनसाठी तशी फारशी बंधनं नाहीत. कुणीही कुठलाही शॉट क्रियेटीव्हली कसाही खेळू शकतो. इकडे बॉलर्सकडे फारसे पर्याय नाहीत. वंशपरंपरागत चालत आलेली तीच ती आउट-स्विंग, इन-स्विंग, कटर, लेग-कटर अशी आयुधे. बॉलर जर तगडा असेल तर बॅट्समनला घाबरवण्यासाठी बाउंसर नावाचा तोफगोळा. स्पिन बॉलर्सची अवस्था तर मध्यमवर्गीय कुटुंबासारखी. लेग-स्पिनर असेल तर लेग-स्पिन, गुगली, फार-फार तर फ्लिपर. ऑफ-स्पिनर त्याहीपेक्षा मर्यादीत, बॅट्समनसाठी ती मेजवानीच असते. बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

काही बॉलर्सनी थोडेफार इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्व वादग्रस्तच ठरले. या इनोव्हेशनचा श्रीगणेशा केला इम्रान खान याने. रिव्हर्स-स्विंगला तिखटपणा आणण्यासाठी त्याने नखे आणि टोपणाचा वापर करुन सीम कुरतडण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे बॉल कधी खाली रहायचा तर कधी झप्पकन बाउंस व्हायचा. काही महाभागांनी तर बॉलची शाइन आणि स्विंग टिकवण्यासाठी व्हॅसलीनचा वापर केला होता. ही इनोव्हेशन्स तशी बेकायदेशीरच होती. खरे इनोव्हेशन आणले ते सकलेन नामक बॉलरने. ऑफ-स्पिन बॉलिंगला नवसंजीवनी देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नेहमीच्या ऑफ-स्पिनसोबत एक बाहेर वळणारा बॉल त्याने विकसीत केला आणि त्याला नाव दिलं 'दुसरा'. ज्या टप्प्यावरुन तो ऑफ-स्पिन टाकायचा त्याच टप्प्यावरुन बेमालुमपणे 'दुसरा' वळवायचा. 'दुसरा' हा सकलेनच्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे होता.

नवीन काही आले की लगेच त्याची कॉपी सुरु होते. 'दुसरा'पण त्याला अपवाद नव्हता. अनेकांनी या 'दुसर्‍या'साठी प्रयत्न केले. आणि इथेच परत दुर्दैव आडवे आले. या 'दुसर्‍या'पायी आय.सी.सी.चा ससेमिरा स्पिन बॉलर्सच्या मागे लागला. राजेश चौहान, हरभजन, मुरलीधरन, सम्युअल्स, शोएब मलिक, या सर्वांना बॉलिंग एक्शनसाठी बायो-मेकॅनिक्सच्या एक्स-रेमधून जावे लागले. राजेश चौहानला तर कपडे काढून तासन्‌तास नेटमधे बॉलिंग करायला लावलं होतं. मुरलीधरनला तर आयुष्यभर संशयाच्या नजरेखालीच बॉलिंग करावी लागली.

आता परत दोन गुणी बॉलर्स संशयाच्या भोवर्‍यात सापडलेत. अजमल आणि सुनिल नरायन (कुणी नरीन म्हणतं). अजमल बॉलला फ्लाईट देऊन 'दुसर्‍यामधे' बॅट्समनला अडकवतो, तर नरीनचा 'मिस्टरी बॉल' डोळ्याला दुर्बीण लावूनही ओळखता येत नाही. पण आय.सी.सी.ला हेही बघवले नाही. दोघांचीही रवानगी (बॉलिंग) सुधारगृहात करण्यात आली आहे. नियमावलीनुसार, बॉलिंग करताना हाताचा कोपरा १५ अंशापेक्षा जास्त वळता कामा नये. अजमल आणि नरीनचा हात अनुक्रमे ४० आणि २२ अंशाने वळतो. हे थोडेसे जास्त आहे. पण तरीही रमीज राजा यांच्या म्हणण्यानुसार खरे तर नियमावलीत थोडी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. आधीच बॉलर्स म्हणजे रंजली गांजलेली प्रजाती आहे. त्यांच्या पदरी नेहमी अवहेलनाच आल्या आहेत. त्यांना थोडीशी तरी सवलत मिळायला हवी. बॅट्समनचाही जरा कस लागू दे. आणि तसेही क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समनचा मुकाबला बघण्यातच मजा असते ना राव!

Sunday, 7 September 2014

कॅलिस- चोविस कॅरेट हिरा

दक्षिण आफ्रिकेत दोन गोष्टींचं पीक मुबलक प्रमाणात येतं. एक, अप्रतिम हिरे आणि दुसरं म्हणजे अजोड असे ऑल-राउंडर क्रिकेटर! १९९१ साली क्रिकेट जगतात री-एंट्री झाल्यानंतर कदाचित आफ्रिकेनंच सर्वात जास्त हिर्‍यासारखे ऑल-राउंडर क्रिकेट जगताला दिले आहेत - मॅकमिलन, पोलॉक, क्लुसनर, क्रोनिए, आणि कॅलिस. पैकी कॅलिस हा पैलू पाडलेला चोविस कॅरेटचा लखलखता हिरा होता. संपूर्ण करियरमधे या हिर्‍याची चमक सतत तेजःपुंजच राहिली.

१९९५-९६ साली सोनेरी केस असलेल्या या स्टाइलिश खेळाडूनं करियरला सुरुवात केली. आफ्रिकेच्या संघाचा दबदबा त्याकाळी नुकताच चालू झाला होता. आपल्या इथं बॉलरनं जरा चांगली बॅटींग केली, की लगेच घिसाडघाई होते त्याला ऑल-राउंडरचा शिक्का मारण्यासाठी. पण जातिवंत ऑल-राउंडर होणं किंवा असणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्याला क्रिकेट देवाचा आशिर्वाद घेऊनच जन्मावं लागतं.

क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं, तर ऑल-राउंडरमधे प्रकार दोन - बॉलिंग ऑल-राउंडर आणि बॅटिंग ऑल-राउंडर.

म्हणजे बेसिक स्किल हे बॉलिंग पण सोबत बॅटिंगही जमते, तो बॉलिंग ऑल-राउंडर. इम्रान खान, वसिम अक्रम, शॉन पोलॉक, कपिल देव, हॅडली हे बॉलिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीमधले.तर दुसर्‍या प्रकारात पिंड बॅटिंगचा, पण बॉलिंग टाकता येते, तो बॅटिंग ऑल-राउंडर. हंसी क्रोनिये, स्टिव्ह वॉ, क्लाइव्ह लॉइड, रवी शास्त्री, क्लुसनर हे बॅटिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीतले. पण या दोन्ही प्रकारात कुठली तरी एक बाजू दुर्लक्षित राहते.

तर या दोन्ही प्रकारामधे जे पारंगत असतात, निष्णात असतात, त्यांना बॅटलिंग ऑल-राउंडर अशी संज्ञा दिली, तर ती वावगी ठरू नये.क्रिकेट इतिहासात फार कमी प्लेयर्स या कॅटेगरीमधे सातत्य ठेवू शकले. सर गॅरी सोबर्स, बोथम, आणि कॅलिस हे या कॅटेगिरीमधले मोजके नामवंत.

क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समन यांची सांगड घालून परफेक्ट-११ची टीम तयार करणं, हे महाकठीण काम. अशा वेळी कॅलिससारखे ऑल-राउंडर देवासारखे धावून येतात.

कॅलिस बॅटिंगच्या बाबतीत टेक्निकली एकदम परफेक्ट. फॉरवर्ड डिफेन्स, बॅकफूट ड्राइव्ह, कव्हर-ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, फ्लिक... सर्व शॉट पुस्तकात दिल्याप्रमाणं अगदी काटेकोर. शॉट खेळताना त्याचा बॅलन्स कधीही ढळला नाही.

तसं बघितलं तर ऑल-राउंडर म्हणजे फक्त बॅटिंग-एके-बॅटिंग किंवा वाटेला आलेल्या ओव्हर टाकणे नव्हे. संघाचा तो आधार असतो. पाच किंवा सहा नंबरवर येऊन तो टीमच्या स्कोअरमधे नाही म्हटलं तरी चाळीस-पन्नासची भर घालतो. कॅलीसनं अशा बर्‍याच वेळा आफ्रिकेला संकटातून बाहेर काढलं आहे. २०११ सालची भारत-आफ्रिका टेस्ट आठवते? आपल्याकडं दीडएकशे रन्सची आघाडी होती. कॅलिस जखमी, आफ्रिका १३० वर सहा विकेट. आपण मालिका जिंकणार, हे जवळपास निश्चित! पण कॅलिस आला, मॉर्कलला सोबत घेऊन सेंन्चुरी मारली, आणि आफ्रिकेला फक्त सामन्याच्याच नव्हे तर मालिका पराभवाच्या संकाटातूनही वाचवलं. अशा अनेक संस्मरणीय खेळी कॅलिसनं खेळल्या आहेत. कॅलिस या नावाचा धाक प्रतिस्पर्धी संघात नेहमी असायचा... कॅलिसमधल्या बॉलरनंही बॅटिंगप्रमाणंच तगडा परफॉर्मन्स दिला होता. उमेदीच्या काळात १४० ते १४५ या स्पीडनं तो बॉलिंग टाकायचा. इतकंच नव्हे, तर कॅलिस हा एक उत्कृष्ट असा स्लीप-फिल्डरही होता. आपण सचिनबद्दल बोलतो, लाराबद्दल बोलतो, पाँटींगची स्तुती करतो; पण कॅलिसही त्यांच्याच तोडीचा होता. मित्रांनो, कसोटी आणि वन-डेमधे दहा हजारापेक्षा जास्त रन्स, तीनशेपर्यंत विकेट्स, आणि दोनशे कॅचेस! खरंच, कॅलिस एक लिजंड होता... किंबहुना 'चोविस कॅरेट हिरा' ही उपमाच त्याच्यासाठी योग्य ठरेल!

प्रिय विराट.......



प्रिय विराट.......
                                        
प्रिय विराट,

मित्रा कसा आहेस? काही नाही रे, म्हटलं सहज चौकशी करावी, इंग्लंडमधे 'ऑल क्लियर' आहे ना? कारण इंग्लंडमधे गेल्यापासून तू जरा 'थंड-थंड' वाटतोयस. दोन टेस्ट झाल्या, नेहमी तुझी गाडी एका 'किक'मधे स्टार्ट होते आणि सुसाट वेगात झीरो टू हन्ड्रेड क्रॉस करते; पण इथे तुझी गाडी स्टार्टच होत नाहीये. फिल्ड करतानापण बॉडी लँग्वेजही थोडी सॉफ्ट वाटतीये. ते एग्रेशन, पॅशन मंदावल्यासारखं जाणवतंय.

नाही, लोक कुजबुजतायत अनुष्का आणि तुझ्या अफेयरबद्दल. अशी चर्चा चालू आहे की, त्या नकछडीच्या सान्निध्याने तुझ्या बॅटिंगला ब्रेक लागलाय. हरी ओम!

मित्रा, थोडं सांभाळून! भले-भले खेळाडू या बॉलिवूड ग्लॅमरच्या मोहजालात कोळ्याच्या जाळ्यात अडकावे त्याप्रमाणे अलगद अडकलेत. याला विदेशी खेळाडूही अपवाद नाहीत. आणि त्याचे काय परिणाम झालेत, याविषयी तू पुरेपूर जाणतोस. सोबर्स - अंजू महेंद्रू, विव्ह रिचर्ड्स - नीना गुप्ता, रवी शास्त्री - अमृता सिंग ही रेट्रो काळातली अफेयर्स. पैकी विदेशी खेळाडूंचं राहूदे रे! त्यांची लाइफ-स्टाईलच अशी आहे - खा, प्या, खेळा, मजा करा, आणि 'सोडून' द्या. ते जास्त मनाला लावून घेत नाहीत. आपला पिंड तसा नाही राजा; आपण विचलीत होतो. अझरचंच उदाहरण घे! ९०च्या दशकात संगीता बिजलानीच्या पुंगीने अशी भुरळ घातली की, अझर स्मृतीभ्रंश झालेल्या रोग्यासारखा वाटत होता. स्क्वेयर कट आणि फ्लिक हे आपले पाळलेले शॉट आहेत हेच तो विसरला होता. लांब कशाला, युवराज - दीपिका आणि धोनी - दीपिका हा डबल-बार कसा होता! २००७ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात युवराजला नामी संधी होती, टेस्ट टीममधे जम बसवण्याची. धोनीनं दीपिकामधून अलगद अंग काढून घेतलं, पण युवराज मात्र दीपिकाच्या मागं फरफटत गेला आणि परत टेस्ट टीममधे कधीही जम नाही बसवू शकला. गांगुलीही नगमासोबत थोडा भरकटत होता, पण वेळीच सावरला. अशा या कथा आणि व्यथा, क्रिकेट - बॉलिवूड अफेयर्सच्या.

क्रिकेट फार अजब खेळ आहे बाबा! इथं फॉर्म आणि फुटवर्क एकदा लडबडलं की सगळंच बिघडतं. मान्य आहे तू तरुण आहेस, थोडंफार अट्रॅक्शन असणार. पण हे विसरू नकोस - तू एक धाकड, हाय-कॅलिबर आणि निडर बॅट्समन आहेस. टीमची कमान बर्‍याच अंशी तुझ्यावर अवलंबून आहे. येणार्‍या काळात इंडीयन टीमचा कॅप्टनही होशील. या तारकांचं काय, खोबरं तिकडं चांगभलं. त्यामुळं भावा, अशा प्रलोभनानं आपलं लक्ष विचलीत होऊ देवू नकोस.



जोपर्यंत स्कोअरची 'भरती' आहे तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा 'ओहोटी' चालू झाली, की एक्स्पर्ट्सची करडी कठोर नजर प्रत्येक बारीक गोष्टींचा कीस काढायला तयार असते. मग तुझं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कमी पडतंय, डावा पाय बॉलच्या रेषेत येत नाही, तो जरा शॉट शरीरापासून दूर खेळतोय, बॅट-पॅडमधे गॅप जास्त राहतेय; असे एक ना अनेक (भले ते नसले तरी) उणे-दुणे काढले जातात.

त्यामुळं कोल्हापुरी श्टाइलमधे सांगतो भावा, आपण भलं, आपलं क्रिकेट भलं. 'आपला एकच पक्ष, क्रिकेटवर लक्ष' एवढंच लक्षात ठेव!