Friday 21 March 2014

क्रिकेट बदलेगा 'एक ओवरमें'


अन्य खेळ बघितले, तर असं दिसतं की सगळ्यांचा फॉर्मट एक, वेळेच बंधन एक, कर्णधार एक आणि कौशल्य, थोड्या फार फरकाने सारखे. पण, क्रिकेट हा खेळ मात्र याला अपवाद आहे.  क्रिकेटची उत्क्रान्ती त्याच्या जन्मापासुन सतत वाढतच गेली. कधी बॅट, कधी बॉल, तर कधी फिल्डिंग, गोष्टी बदलतच गेल्या. गतीशील परिवर्तन हा फंडा नंतर आणखीन गतीशील झाला. नियम बदलत गेले, अर्थातच, बॅटिंग ही क्रिकेटची आवडती गर्लफ्रेन्ड असल्यामुळे बॉलिंगपेक्षा तिला झुकते माप देणारे असे नियम तयार झाले;  आणि आता टी-२० या खेळ प्रकारामुळे तर या गर्लफ्रेन्डचे लाड आणखी वाढले. खेळाचा साचा आणि ढाचा कॉम्प्रेस होत गेला. खेळाचे स्वरूप नॅनो वरून मायक्रो-नॅनो कडे झुकले. चार वर्षातुन एकदा येणारा वर्ल्ड कप, टी-२० च्या बहाण्याने वर्षातून दोन वेळा हजेरी लावू लागला.


खेळाचा प्रकार कोणताही असो, कौशल्य आणि मनोरंजन या दोन गोष्टींची सांगड जुळुन आली, की त्याला चांगला ‘प्रेक्षकवर्ग मिळतो. कसोटी क्रिकेटचा एक दर्दी चाहता वर्ग आहे, त्याला गोलंदाज आणि फलंदाज या  दोघांचा कौशल्यपूर्ण खेळ बघायचा असतो; तर टी-२० ची रॅप, जॅझ ही धुन कौशल्यपूर्ण मनोरंजन या प्रकारात मोडत असल्यामुळे प्रत्येकाला ती आपलीशी वाटते. आता त्याच टी-२०चा वर्ल्ड कप तयार आहे आपला जलवा दाखवण्यासाठी.

सर्व बाजुंचा विचार केला तर, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, लंका, सा. आफ्रिका हेच संघ बाकीच्यांना बाजुला सारुन वर्ल्ड कप उचलण्यासाठीचे तगडे दावेदार दिसतात. कारण, ह्याच संघांकडे या फॉर्मटसाठी लागणारे सर्व उपयुक्त मटेरियल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता, भारताचा संघ या स्पर्धेत कुठपर्यंत मजल मारणार? हा जिव्हाळ्याचा प्रश्न! २००७ च्या आठवणी काढत, तोच जलवा टीम परत दाखवेल, अशी भाबडी आशा आम्हा सर्व क्रिकेटप्रेमींना आहे, ती तशी प्रत्येक वेळी असते म्हणा. पण, यंदाही मागच्या वेळेप्रमाणेच गणित जुळणं किंवा जुळवून आणणं जरा अवघड दिसतंय. कारणं स्पष्ट आणि नेहमी सारखीच आहेत. भक्कम बॅटिंग, जी दर वेळी मोक्याच्या क्षणी भरकटते, इथे काही वेगळा उजेड पाडेल याची शाश्वती कमी आहे . बरं, विराट आणि धोनी हे काही सुपरमॅन नाहियेत, प्रत्येक वेळी मॅच जिंकुन द्यायला. बॉलिंग…, आता कशाला तोंड उघडायचं; सगळ्यांनी तोंडसुख घेऊन झालं आहे. दर वेळी आपलं “नया है वह “ असं म्हणून वेळ मारून न्यायची. फिल्डिंग; ठिक-ठाक. पण, तीही दोलायमान. कधी अप्रतिम, तर कधी टुकार फिल्डरला लाजवेल अशी. हं, आता स्पर्धा उपखंडात आहे म्हणून स्पिन बॉलिंगच्या आधारे, आणि फ्लॅट-ट्रॅक बॅटिंगच्या सहाय्याने अंधुकशी आशा ठेवता येईल.

“दुनिया बदलेगी एक ओवरमें,” असं म्हणत चॅनेलवाल्यांनी माहोल आधीच तयार केला आहे. त्यात, मॅचेस संध्याकाळी असल्यामुळे क्रिकेटप्रेमींना खोटं बोलुन ऑफिस, कॉलेजला दांड्या मारण्याची फारशी गरज नाही. भरीला सोशल मिडिया आहेच, आपल्या उचंबळलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी. “शेवटची ओवर त्याला द्यायला नको होती रे, हा शॉट खेळायची गरज होती का?”, ते “याला का घेतात रे टिम मधे?, धोनी, नाद करायचा नाही कोणी” या ट्विटस सोबत फेसबुक, वॉट्स-अप यांचे पेजेस मॅच नंतरच्या कौतुकसोहळा, तीव्र भावना, आणि शिव्या यांनी ओतप्रोत भरतील. बरं, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड ते इंडिया, वेस्ट-इंडिज पर्यंतच्या सर्व समर्थकांना ‘आपलीच टीम जिंकणार’ असा दृढ विश्वास आहे. आता, हा विश्वास कोण सार्थ ठरवतो, ते ‘क्रिकेट’च ठरवेल.