Sunday 7 September 2014

कॅलिस- चोविस कॅरेट हिरा

दक्षिण आफ्रिकेत दोन गोष्टींचं पीक मुबलक प्रमाणात येतं. एक, अप्रतिम हिरे आणि दुसरं म्हणजे अजोड असे ऑल-राउंडर क्रिकेटर! १९९१ साली क्रिकेट जगतात री-एंट्री झाल्यानंतर कदाचित आफ्रिकेनंच सर्वात जास्त हिर्‍यासारखे ऑल-राउंडर क्रिकेट जगताला दिले आहेत - मॅकमिलन, पोलॉक, क्लुसनर, क्रोनिए, आणि कॅलिस. पैकी कॅलिस हा पैलू पाडलेला चोविस कॅरेटचा लखलखता हिरा होता. संपूर्ण करियरमधे या हिर्‍याची चमक सतत तेजःपुंजच राहिली.

१९९५-९६ साली सोनेरी केस असलेल्या या स्टाइलिश खेळाडूनं करियरला सुरुवात केली. आफ्रिकेच्या संघाचा दबदबा त्याकाळी नुकताच चालू झाला होता. आपल्या इथं बॉलरनं जरा चांगली बॅटींग केली, की लगेच घिसाडघाई होते त्याला ऑल-राउंडरचा शिक्का मारण्यासाठी. पण जातिवंत ऑल-राउंडर होणं किंवा असणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्याला क्रिकेट देवाचा आशिर्वाद घेऊनच जन्मावं लागतं.

क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं, तर ऑल-राउंडरमधे प्रकार दोन - बॉलिंग ऑल-राउंडर आणि बॅटिंग ऑल-राउंडर.

म्हणजे बेसिक स्किल हे बॉलिंग पण सोबत बॅटिंगही जमते, तो बॉलिंग ऑल-राउंडर. इम्रान खान, वसिम अक्रम, शॉन पोलॉक, कपिल देव, हॅडली हे बॉलिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीमधले.तर दुसर्‍या प्रकारात पिंड बॅटिंगचा, पण बॉलिंग टाकता येते, तो बॅटिंग ऑल-राउंडर. हंसी क्रोनिये, स्टिव्ह वॉ, क्लाइव्ह लॉइड, रवी शास्त्री, क्लुसनर हे बॅटिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीतले. पण या दोन्ही प्रकारात कुठली तरी एक बाजू दुर्लक्षित राहते.

तर या दोन्ही प्रकारामधे जे पारंगत असतात, निष्णात असतात, त्यांना बॅटलिंग ऑल-राउंडर अशी संज्ञा दिली, तर ती वावगी ठरू नये.क्रिकेट इतिहासात फार कमी प्लेयर्स या कॅटेगरीमधे सातत्य ठेवू शकले. सर गॅरी सोबर्स, बोथम, आणि कॅलिस हे या कॅटेगिरीमधले मोजके नामवंत.

क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समन यांची सांगड घालून परफेक्ट-११ची टीम तयार करणं, हे महाकठीण काम. अशा वेळी कॅलिससारखे ऑल-राउंडर देवासारखे धावून येतात.

कॅलिस बॅटिंगच्या बाबतीत टेक्निकली एकदम परफेक्ट. फॉरवर्ड डिफेन्स, बॅकफूट ड्राइव्ह, कव्हर-ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, फ्लिक... सर्व शॉट पुस्तकात दिल्याप्रमाणं अगदी काटेकोर. शॉट खेळताना त्याचा बॅलन्स कधीही ढळला नाही.

तसं बघितलं तर ऑल-राउंडर म्हणजे फक्त बॅटिंग-एके-बॅटिंग किंवा वाटेला आलेल्या ओव्हर टाकणे नव्हे. संघाचा तो आधार असतो. पाच किंवा सहा नंबरवर येऊन तो टीमच्या स्कोअरमधे नाही म्हटलं तरी चाळीस-पन्नासची भर घालतो. कॅलीसनं अशा बर्‍याच वेळा आफ्रिकेला संकटातून बाहेर काढलं आहे. २०११ सालची भारत-आफ्रिका टेस्ट आठवते? आपल्याकडं दीडएकशे रन्सची आघाडी होती. कॅलिस जखमी, आफ्रिका १३० वर सहा विकेट. आपण मालिका जिंकणार, हे जवळपास निश्चित! पण कॅलिस आला, मॉर्कलला सोबत घेऊन सेंन्चुरी मारली, आणि आफ्रिकेला फक्त सामन्याच्याच नव्हे तर मालिका पराभवाच्या संकाटातूनही वाचवलं. अशा अनेक संस्मरणीय खेळी कॅलिसनं खेळल्या आहेत. कॅलिस या नावाचा धाक प्रतिस्पर्धी संघात नेहमी असायचा... कॅलिसमधल्या बॉलरनंही बॅटिंगप्रमाणंच तगडा परफॉर्मन्स दिला होता. उमेदीच्या काळात १४० ते १४५ या स्पीडनं तो बॉलिंग टाकायचा. इतकंच नव्हे, तर कॅलिस हा एक उत्कृष्ट असा स्लीप-फिल्डरही होता. आपण सचिनबद्दल बोलतो, लाराबद्दल बोलतो, पाँटींगची स्तुती करतो; पण कॅलिसही त्यांच्याच तोडीचा होता. मित्रांनो, कसोटी आणि वन-डेमधे दहा हजारापेक्षा जास्त रन्स, तीनशेपर्यंत विकेट्स, आणि दोनशे कॅचेस! खरंच, कॅलिस एक लिजंड होता... किंबहुना 'चोविस कॅरेट हिरा' ही उपमाच त्याच्यासाठी योग्य ठरेल!

प्रिय विराट.......



प्रिय विराट.......
                                        
प्रिय विराट,

मित्रा कसा आहेस? काही नाही रे, म्हटलं सहज चौकशी करावी, इंग्लंडमधे 'ऑल क्लियर' आहे ना? कारण इंग्लंडमधे गेल्यापासून तू जरा 'थंड-थंड' वाटतोयस. दोन टेस्ट झाल्या, नेहमी तुझी गाडी एका 'किक'मधे स्टार्ट होते आणि सुसाट वेगात झीरो टू हन्ड्रेड क्रॉस करते; पण इथे तुझी गाडी स्टार्टच होत नाहीये. फिल्ड करतानापण बॉडी लँग्वेजही थोडी सॉफ्ट वाटतीये. ते एग्रेशन, पॅशन मंदावल्यासारखं जाणवतंय.

नाही, लोक कुजबुजतायत अनुष्का आणि तुझ्या अफेयरबद्दल. अशी चर्चा चालू आहे की, त्या नकछडीच्या सान्निध्याने तुझ्या बॅटिंगला ब्रेक लागलाय. हरी ओम!

मित्रा, थोडं सांभाळून! भले-भले खेळाडू या बॉलिवूड ग्लॅमरच्या मोहजालात कोळ्याच्या जाळ्यात अडकावे त्याप्रमाणे अलगद अडकलेत. याला विदेशी खेळाडूही अपवाद नाहीत. आणि त्याचे काय परिणाम झालेत, याविषयी तू पुरेपूर जाणतोस. सोबर्स - अंजू महेंद्रू, विव्ह रिचर्ड्स - नीना गुप्ता, रवी शास्त्री - अमृता सिंग ही रेट्रो काळातली अफेयर्स. पैकी विदेशी खेळाडूंचं राहूदे रे! त्यांची लाइफ-स्टाईलच अशी आहे - खा, प्या, खेळा, मजा करा, आणि 'सोडून' द्या. ते जास्त मनाला लावून घेत नाहीत. आपला पिंड तसा नाही राजा; आपण विचलीत होतो. अझरचंच उदाहरण घे! ९०च्या दशकात संगीता बिजलानीच्या पुंगीने अशी भुरळ घातली की, अझर स्मृतीभ्रंश झालेल्या रोग्यासारखा वाटत होता. स्क्वेयर कट आणि फ्लिक हे आपले पाळलेले शॉट आहेत हेच तो विसरला होता. लांब कशाला, युवराज - दीपिका आणि धोनी - दीपिका हा डबल-बार कसा होता! २००७ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात युवराजला नामी संधी होती, टेस्ट टीममधे जम बसवण्याची. धोनीनं दीपिकामधून अलगद अंग काढून घेतलं, पण युवराज मात्र दीपिकाच्या मागं फरफटत गेला आणि परत टेस्ट टीममधे कधीही जम नाही बसवू शकला. गांगुलीही नगमासोबत थोडा भरकटत होता, पण वेळीच सावरला. अशा या कथा आणि व्यथा, क्रिकेट - बॉलिवूड अफेयर्सच्या.

क्रिकेट फार अजब खेळ आहे बाबा! इथं फॉर्म आणि फुटवर्क एकदा लडबडलं की सगळंच बिघडतं. मान्य आहे तू तरुण आहेस, थोडंफार अट्रॅक्शन असणार. पण हे विसरू नकोस - तू एक धाकड, हाय-कॅलिबर आणि निडर बॅट्समन आहेस. टीमची कमान बर्‍याच अंशी तुझ्यावर अवलंबून आहे. येणार्‍या काळात इंडीयन टीमचा कॅप्टनही होशील. या तारकांचं काय, खोबरं तिकडं चांगभलं. त्यामुळं भावा, अशा प्रलोभनानं आपलं लक्ष विचलीत होऊ देवू नकोस.



जोपर्यंत स्कोअरची 'भरती' आहे तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा 'ओहोटी' चालू झाली, की एक्स्पर्ट्सची करडी कठोर नजर प्रत्येक बारीक गोष्टींचा कीस काढायला तयार असते. मग तुझं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कमी पडतंय, डावा पाय बॉलच्या रेषेत येत नाही, तो जरा शॉट शरीरापासून दूर खेळतोय, बॅट-पॅडमधे गॅप जास्त राहतेय; असे एक ना अनेक (भले ते नसले तरी) उणे-दुणे काढले जातात.

त्यामुळं कोल्हापुरी श्टाइलमधे सांगतो भावा, आपण भलं, आपलं क्रिकेट भलं. 'आपला एकच पक्ष, क्रिकेटवर लक्ष' एवढंच लक्षात ठेव!

"इ बारभी टेस्ट सिरीज ज़ितेकी रही..."


लॉर्डसच्या हिरव्यागार पीचवर इंग्लंडला मात दिल्यानंतर आम्हा क्रिकेटप्रेमींना स्वप्नं पडू लागली होती; आता इंग्लंडमधे आपला झेंडा फडकणार. ईशांत, शामी, वरुण आरून, भुवी, जडेजा इंग्लंड फलंदाजावर हल्लाबोल करणार. कोहली, पुजारा, विजय, रहाणे, धोणी इंग्लंड बॉलर्सचा टिच्चून सामना करणार. पण जेव्हा हे ढग, आता विजयाचा पाऊस पाडणार असे वाटत असताना हवेतच विरुन गेले, तेव्हा लगानचे काही डायलॉग आठवले - "बखतसे पहिले खुशियां..." आणि "इ बार भी टेस्ट सिरीज जितेकी रहीं."

विदेश दौर्‍यागणिक दौरे जाताहेत, अनुभवाची (पराभवाची) शिदोरी बळकट होतेय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण अपयशाच्या या पायर्‍या संपता संपत नाहियेत. सिरिज संपल्यानंतर धोनीचे तेच-तेच स्पष्टीकरण - "आम्ही चांगला खेळ केला, पण आमच्या खेळाडूंना या वातावरणात खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे काही (त्याच-त्याच) चुका झाल्या. या अनुभवाच्या आधारे आम्ही पुढच्यावेळी चांगली कामगिरी करू."

त्यात रवी शास्त्रीने अगदी प्रेमाने समजूत घातली. आपली पोरं अजून कोवळी आहेत, अशा वातावरणात जुळवून घेणे जरा अवघड असते, आपली ताकद वन-डे आणि २०-२० आहे. हे काय जस्टिफिकेशन आहे! (त्याचं बक्षीसही त्यांना मिळालं म्हणा.)

९४, १४८, १५२, १७८ हे आपले मागल्या कसोटीतील स्कोर आहेत.
अरे, तिकडे झिंबाब्वे दोन वेळचं मानधन कसं-बसं मिळवून डेल स्टेन, मॉर्कल यांचा सामना करीत ९० ओव्हर खेळून काढतात. आणि इथं सर्व सुख-सुविधा, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, मुख्य कोच असूनही आपल्याला पन्नास ओव्हरही खेळणं जीवावर येतं!

आजही दर्दी क्रिकेट चाहता टेस्ट क्रिकेट आवर्जून बघतो. कारण टेस्ट क्रिकेटमधेच बॉलर बॅट्समनला जाब विचारू शकतो. स्विंग आणि सीम होणार्‍या पीचवर बॅट्समनला नाचवू शकतो. याचा सामना करुन जो बॅट्समन रन्स काढतो त्या रन्सची आणि खेळीची गोडी आणि आत्मियता काही वेगळीच असते...

पण आपल्याला चटक लागली आहे, फक्त वीस-तीस ओव्हर्स खेळून पन्नास-साठ रन्स काढायची. ही सवय म्हणजे जित्याची खोड झाली आहे आता.



इंग्लड विरुद्धच्या या टेस्ट मॅचेसमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. पीचवर नांगर टाकून, संयम दाखवत हळूहळू रन्स जमा करायची तसदी भारतीय फलंदाजांना नकोय. बॉल कसा स्विंग होतोय, पीचवर पडल्यानंतर कुठे मूव्ह होतोय, स्विंग कसा कव्हर करायचा, कुठला बॉल ड्राइव्ह करायचा, नवीन बॉलवर सुरुवातीला बॅट शरीराच्या जास्तीत जास्त जवळ ठेवून डिफेन्सिव शॉट कसा खेळायचा, या गोष्टींचा विचार करताना जास्त कुणी दिसलंच नाही. बॉल पुढं दिसला की मार ड्राईव्ह. तुम्ही नेटमधे कितीही सराव करा, कोच तुम्हाला कितीही टिप्स देऊ दे, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष खेळपट्टीवर राहून सराव केलेल्या गोष्टी अंमलात आणत नाही, त्या मेंटल ब्लॉकमधून बाहेर येत नाही, तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे...

आता या सर्व गोष्टी फक्त या सिरीजमधे घडल्या आहेत असं नाही. २०११ पासून १४-१५ टेस्टमधे हेच घडत आलंय.

बरं, ॲन्डरसन, ब्रॉड हे काही बॉलला मंतरलेले धागे-दोरे बांधून बॉलिंग करत नव्हते. इंग्लंडमधे नवीन बॉल, हिरवं पीच, ढगाळ हवामान अशा वातावरणात बॉल स्विंग होणारच. सिमवर पडून कधी आत आणि कधी बाहेर मूव्हमेंट होणारच. अशा गोष्टी हाताळण्यातच तर खरं स्किल असतं. त्यासाठीच तर एवढ्या सगळ्या खेळाडूंमधून अकरा बेस्ट खेळाडू निवडले जातात...

पण जर चॅलेंज स्विकारायचं जिगरच नसेल, गल्ली क्रिकेट खेळण्यातच हे खेळाडू धन्यता मानत असतील, तर वर्षानुवर्षे परदेशात असेच पराभव होत राहतील. आणि प्रत्येक वेळेला राग अनावर होऊन क्रिकेटप्रेमींना सनी देओलचा ड़ायलॉग म्हणावा लागेल -

सिरीजपे सिरीज, सिरीजपे सिरीज, सिरीजपे सिरीज निकलती जा रही है, लेकिन जीत नहीं मिल रही! :-(