Friday 9 March 2012

हम इंतजार करेंगे...!

हम इंतजार करेंगे...
हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक,
खुदा करेके कयामत हो और तू आये....!

गेले आठ महिने सचिनच्या महाशतकाची वाट पाहताना हेच गाणे आता तोंडावर येते. तो प्रत्येकवेळी खेळायला आल्यावर (गावठी) शॅम्पेनची बाटली घेऊन आम्ही मित्र बसलेलो असतो की आज होणार साला सेन्चुरी. पण प्रत्येकवेळी आनंदाने आणलेली ती बाटली दुःख पचवण्यासाठी मोकळी केली जाते. आजकाल ९९ हा आकडा नावडता झाला आहे. असो. प्रत्येकाची जवळ-जवळ हीच अवस्था आहे. सचिन पेक्षा त्याच्या फॅन्सना आणि मीडियाला त्याच्या शतकाची जास्त चिंता आहे. टिपिकल लोकल मिडियावाले सतत गोल्डन सेन्चुरीविषयी तासन्‌तास चर्चा करत असतात. "क्या लगता है आपको सचिन दबाव नही झेल पा रहे अपने माइलस्टोन का? या फिर कुछ ज्यादाही सोच रहे है अपनी सेन्चुरी के बारेमे? कैसे खेलना चाहिये उनको? क्या उनके तकनीक में कुछ खराबी है? सवाल अभी बहोत है... आप कहीं मत जाइये, लौटेंगे एक ब्रेक के बाद.....!"

सचिनसाठी शंभरावी सेन्चुरी काही क्षणांसाठी स्पेशल असेल. नंतर तो फक्त एक आकडा होईल. इतकी वर्षे खेळून झाल्यानंतर सचिनलाही ठाऊक आहे की जेव्हा जेव्हा तो खेळायला उतरेल तेव्हा-तेव्हा काही ना काही रेकॉर्ड्स होत राहणार आहेत आणि त्याच्या झोळीत नवनवीन कीर्तिमान पडत राहणार आहेत. सचिन जेव्हा सोळाव्या वर्षी क्रिकेट खेळायला आला तेव्हा अब्दुल कादिरच्या "गो होम अ‍ॅण्ड ड्रिंक मिल्क" या टोमण्याला त्याने पुढे सरसावून सिक्स मारून उत्तर दिले, ऑस्ट्रेलिया मध्ये पर्थ ग्राउंडवर मर्व हुजेसच्या स्लेजिंगला सेन्चुरीने उत्तर दिले. सचिन नेहमीच व्हिव रिचर्ड्सच्या आक्रमक खेळीवर फिदा होता आणि त्यांच्या स्टाइलनुसार खेळला. 'बॅड पॅच' दरम्यान बॅट आणि म्युझिक हेच त्याचे बेस्ट फ्रेंड होते. सचिनची पहिली टेस्ट सेन्चुरी जरी पदार्पणाच्या पहिल्या सिरीजमध्ये झाली असली तरी वन-डे मधल्या सेन्चुरीसाठी त्याला १९९४ पर्यंत वाट पहावी लागली (त्याच्या प्रिय संघाविरुद्ध... ऑस्ट्रेलिया विरुद्ध!). जवळ-जवळ दहा वेळा तो सेन्चुरीच्या समीप आला होता, पण कधी दुष्ट बॉलर्सनी तर कधी अम्पायर्सनी त्याला भेटू दिलं नाही. इंग्लंड दौर्‍यापासून सेन्चुरी त्याला हुलकावणी देत आहे ती पार ऑस्ट्रेलिया दौरा संपला तरी रुसून बसली आहे. कधी गिब्सन कधी चॅपल बंधू, कधी कपिल, तर कधी स्टीव वॉ सांगत आहेत की तेंडुलकर गोल्डन सेन्चुरीचे दडपण झेलू शकत नाहीये.

...९९ सेन्चुरींपर्यंत जो नेहमी दडपण झेलत आणि खेळत आला आहे, तो एका सेन्चुरीसाठी दडपणाला दाद देणार आहे का? बिचार्‍या दडपणाला पण कधी-कधी सचिनचं दडपण येत असेल!

आम्ही क्रिकेटप्रेमी आशा करतो की आमची लोकल शॅम्पेनची बाटली सचिनच्या 'गोल्डन सेन्चुरी'साठी लवकर ओपन होईल. तोपर्यंत...

हम इंतजार करेंगे...
हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक...

No comments:

Post a Comment