Wednesday 20 February 2013

ऑस्ट्रेलिया... "आत्ता खरी टेस्ट!"


चला, अजूनपर्यंत तरी “मला टर्निंग पिच पाहिजे, फ्लॅट पिच हवं, सेहवाग नको, पियुष चावला पाहिजे, ऑस्ट्रेलियाच्या बॅटिन्गसाठी वेगळं पिच, इंडियाच्या बॅटिन्गसाठी वेगळं पिच” असा बालहट्ट धोनीनं धरला नाही. नाही, तसं मिडियासमोर तरी हे रडगाणं धोनीनं बोलून दाखवलेलं नाही.

नव्या दमाचा ऑस्ट्रेलियन संघ आला आहे. सिडल, पॅटिन्सन, स्टार्क या तोफा घेऊन, जोडीला जोन्सन नावाची अनुभवी एके-47 आहेच, सोबत दिमतीला लायन, दोहार्ती, मॅक्सवेल या नवख्या गन्सही आहेत. स्वतः शस्त्रसज्ज होऊन मागील काही मॅचेसमध्ये भीम-पराक्रम गाजवून क्लार्क आपल्या पराक्रमी सैन्यासोबत टेस्ट क्रिकेटचं युद्ध खेळण्यासाठी संपूर्ण रणनीतीने सज्ज आहे. आता बाकीच्या गोष्टी म्हणाल, जसं की शब्दांची कूटनीती, वाक्बाणांच्या चाली, मैदानाची रणनीती, या गोष्टी तर ऑस्ट्रेलियावाले क्रिकेट खेळण्याआधीपासूनच शिकलेले आहेत.

बॅटिन्ग असू  दे नाहीतर बॉलिन्ग, आक्रमण करत राहणे हे ऑस्ट्रेलियाच्या रक्तातच आहे. बॉलिन्ग करताना त्यांचा एक फंडा असतो - "रिसोर्स विरुद्ध आउटपुट". ते आउटपुटवर जास्त लक्ष देत नाहीत, तर रिसोर्स कमी करण्याकडं जास्त लक्ष देतात. म्हणजे, आउटपुट आपोआपच कमी  होतं. (इथं आउटपुट म्हणजे रन्स आणि रिसोर्स म्हणजे बॅट्समन!) हाच फंडा बॅटिन्गसाठी - आहे त्या रिसोर्सेसचा जास्तीत जास्त उपयोग करून जास्तीत जास्त आउटपुट काढतात. अगदी शेवटचे दोन-तीन गडीसुद्धा नाही म्हणत म्हणत पन्नास-साठ रन्स जोडतातच.


इकडं आपले गडी सेहवाग, रायडू, पुजारा, कोहली आहेत दमदार, पण चांगलं खेळत असताना मधेच काहीतरी उरफाटा शॉट खेळायची हुक्की येते त्यांना आणि नको त्या वेळी विकेट देऊन बसतात. निदान ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध तरी त्यांनी थोडं शांतचित्तानं खेळावं. (द्रविड बिचारा विकेट टिकवायचे धडे घालून गेला, थोडंफार तरी शिकावं की...) तेंडूलकर! जिव्हाळ्याचा विषय. आपली ताकद आणि अनुभव या सिरीजमध्ये त्याच्या कट्टर संघाविरुद्ध तो दाखवेल याविषयी मला आशाच नाही तर खात्री आहे. (कदाचित ही त्याची शेवटची सिरीज असेल...) धोनीसाहेबांनी थोडं आपलं लक्ष पिचपेक्षा बॅटिन्गकडं दिलं तर टीमला तेवढाच हातभार लागेल. (बाकी 'आयपीएल'ची बोली आधीच झाली आहे, हे नशीब!)

आपली फास्ट बॉलिन्ग इंग्लंड सिरीजपेक्षा थोडी ठीक वाटते. (आपल्या स्वभावामुळे!!) मैदान गाजवणारा श्रीशांत, नवीन, हातभर बॉल स्विंग करणारा स्लीम-ट्रिम भुवनेश्वर कुमार, जीव तोडून बॉलिन्ग करणारा आमचा इशांत आणि उंच उडी मारून बॉल टाकणारा दिंडा, सुरुवातीला 'रेड चेरी' (इथं मला नवा करकरीत लाल चेंडू म्हणायचंय) सांभाळतील असं वाटतंय. तसं आपलं वंशपरंपरागत स्पिन डिपार्टमेन्ट जरा वरचढ वाटतं. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा जिवलग मित्र(!) हरभजन, धोनीचा खास मित्र आश्विन, आणि ओझाभाऊ स्पिनचं जाळं का काय म्हणतात ते टाकून कांगारूंना जाळ्यात ओढतील अशी अपेक्षा आहे…

पण काहीही असलं तरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटचं द्वंद्व पाहण्याची वेगळीच मजा येते...
आता प्रत्यक्ष मैदानावर आपले स्पेशल-11 काय करतात ते पाहूच...!

तमाम क्रिकेटप्रेमींसाठी एक छोटासा लेख,

रितेश कदम
९०११०२००१५

No comments:

Post a Comment