Wednesday 6 November 2013

ओ माय गॉड, ओ माय गॉड!


अखेर तो नको असलेला दिवस आलाच. १९८९ साली घेतलेलं शिव-धनुष्य सचिननं आज खाली ठेवलं. तू परत बॅट उचलणार नाहीस, परत मैदानावर येणार नाहीस, तू मैदानावर येताना आणि जातानासुद्धा वाजणार्‍या टाळ्या  आता निस्तब्ध होतील. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कट, तो अप्पर कट, तो मिडल स्टम्पवरच्या चेंडूचा लेग-ग्लान्स, डान्सिंग डाउन द विकेट आणि स्पिनरला मारलेला सिक्स, वेट बॅकफूट वर ट्रान्सफर करुन मारलेला कवर ड्राइव्ह हे सगळं आता कुठे शोधायचं...?

तू रिटायर होणार, हे कळल्यावर तुझ्या विषयी रकानेच्या रकाने भरून आले आणि अजूनही चालूच आहेत. मग आम्ही पामर आणखी काय लिहीणार? तुझी प्रत्येक सेन्च्युरी, हाफ-सेन्च्युरी तेंडुलकर-वेड्यांना तोंड पाठ आहे. कुणी तुला देव, कुणी जादुगार, कुणी मसिहा, कुणी कलाकार, कुणी सुपरमॅन, तर कुणी गळ्यातला ताईत अशा अनेक उपमा दिल्या. कुणी तुझ्यासाठी आणि फक्‍त तुझ्यासाठी क्रिकेट बघत होतं, आता तू रिटायर होणार म्हटल्यावर तेच वेडे क्रिकेट बघणं बंद करणार आहेत म्हणे. फेसबुकवर तर मी असं वाचलं की, तुझ्या शेवटच्या मॅचचं तिकिट मिळवण्यासाठी कुणीतरी घर गहाण ठेवलं! गौतम नावाच्या सचिनवेड्यानं तर पूर्ण आयुष्यच तुझ्यासाठी वाहून घेतलं. इतकी क्रेझ तू लोकांच्यात निर्माण केलीस. याला सचिनची बॅटिंग तीन दिवस रोज सकाळ-संध्याकाळ दाखवा, ताप उतरेल, एवढंच म्हणायचं राहिलं होतं.

गणित कच्चं असलेल्या लोकांनासुद्धा तुझ्या टेस्ट, वन-डे, ट्वेंटी-ट्वेंटीची सरासरी दोन डेसिमलपर्यंत पाठ आहे. तुझ्याविषयी लोकांना इतकं माहित आहे की त्यांच्यासमोर आम्ही ढ, अडाणी भासतो. मग तुझ्याविषयी आणखी काय सांगणार? पण आमच्यातला क्रिकेट-किडा, आणि तुझ्याविषयीचं प्रेम आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हतं. आणि तुझ्याबद्दल लिहायचं म्हणजे थोडी तयारी करायला पाहिजे, 'उचलली लेखणी लावली कागदाला' असं थोडीच चालणार होतं. तशी आमची स्मरणशक्ती जरा कमीच आहे पण, क्रिकेटविषयी जे काही आम्हाला तोडकं-मोडकं ज्ञान होतं ते वापरून, आणि तुझ्या कारकिर्दीचा आढावा घेऊन थोडंफार लिहिलं आहे.

जसा कृष्ण अर्जुनाचा सारथी, गुरु, सल्लागार होता, तसाच, क्रिकेट हाच सचिनचा सारथी, गुरु, सल्लागार होता. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'… याच उक्तिप्रमाणे सचिन इतकी वर्षं खेळत राहिला. २३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांच्या थप्पी त्यानं रचल्या. कुठलंही रेकॉर्ड काढा, सचिनचं नाव त्यावर आहेच. सचिनला रेकॉर्डची आणि रेकॉर्डला  सचिनची सवयच होती. १९९०च्या दरम्यानचे जॉन ऐम्बुरी ते शेन वॉर्न आणि पुढे मुरलिधरन, सकलेन मुश्ताकपर्यंत, सोबतच मर्व हुजेस, मॅग्राथ, डोनाल्ड, अक्रम ते स्टेन, ब्रेट ली पर्यंत सर्वांना सचिननं बॅटिंग म्हणजे काय, याचं प्रॅक्टीकल वेळोवेळी दाखवून दिलं होतं.

'हम जहाँपे खडे होते हैं, लाइन वहींसे शुरु होती है', असा बच्चनचा एक डायलॉग आहे, त्याप्रमाणे, 'हम जहाँपे खडे होते हैं, क्रिकेट वहींसे शुरु होता है', हा पायंडा तू पाडलास. तुला चौपाटीवर भेळ खायला जायचं म्हटलं तरी तिथल्या सुरक्षा यंत्रणेवर ताण यायचा, इतकी लोकप्रियता तू मिळवलीस.

पुन्हा येणे नाही....


अनेक खेळाडू त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीसाठी ओळखले जातात. सर विव्ह रिचर्डस, त्यांच्या १९७९च्या वर्ल्ड-कप फायनलमधील सेन्चुरीसाठी, बोथम त्याच्या १९८१च्या 'बोथम सीरिज'साठी, कपिल देवच्या १९८३ मधील १७५ धावा, वसिम अक्रमचा तो १९९२ वर्ल्ड-कप मधील मॅजिक स्पेल, वॉर्नने गॅटिंगला टाकलेला सुपर्ब-बॉल... पण, तुझ्या अशा अनेक खेळी आहेत, किती म्हणून सांगाव्यात. करियरच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून वाचवलेली टेस्ट मॅच, अब्दुल कादिर या महान लेग-स्पिनरला मारलेल्या सिक्स, पर्थच्या अतिशय फास्ट पिचवर ह्युजेस, ब्रुस रीड, व्हिटने यांच्याविरुद्धची शतकी खेळी, त्यानंतर मग चालूच होतं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजाहमधील वादळ, चेन्नईमधे पाक, परत २००३च्या वर्ल्ड-कपमध्ये पाक, २००७-०८ मधील सिडने… असं मोजत गेलो तर एनसायक्लोपिडीया तयार होईल!

प्रत्येक झळाळत्या गोष्टीला काळी किनार असते. तू ही त्याला अपवाद नव्हतास. १९९७ हे तसंच एक काळं वर्ष. मॅच फिक्सिंगचा ससेमिरा भारतीय टीम, आणि कॅप्टन या नात्यानं तुझ्यामागे लागला होता. त्यानंतरही कसोटी मॅच जिंकून देण्याच्या तुझ्या ताकदीविषयी तुझ्यावर टीका होत राहिली. परत, तू ग्रेट की लारा, वॉची खेळी चांगली की तुझी, इथपासून ते तू रेकॉर्डसाठी जास्त खेळतोस इथपर्यंत उहापोह झाले. ज्यांनी आयुष्यभर बेशिस्तपणा दाखवला, अप्रामाणिकपणाचा कळस केला त्यांनी तुझ्या खरेपणाविषयी शंका घेतल्या. पण, या सर्व गोष्टींना तुझं एकच उत्तर असायचं - परत एक शतकी खेळी, परत एक विक्रम, परत एक मालिका-विजय! मग हेच टीकाकार तुझी गोड-गोड स्तुती करायचे, कसे? - 'मी देव पाहिलाय, तो भारतासाठी चार नंबरवर खेळतो', 'सचिन माझ्या स्वप्‍नात येतो', 'पुढल्या जन्मी मला सचिन होणे आवडेल' वगैरे, वगैरे…

क्रिकेटनं तुला भरभरून दिलं, तू आम्हाला भरभरून दिलंस, त्या बदल्यात परत क्रिकेटप्रेमींनी तुला भरभरून प्रेम दिलं. फक्‍त क्रिकेटर म्हणून नाही तर, एक सुसंस्कृत क्रिकेटर म्हणून तू स्वतःची ओळख निर्माण केलीस. स्वतःच्या नावाप्रमाणेच तू प्रत्येक बाबतीत 'प्युअर', शुद्ध राहिलास. प्युअर खेळ, प्युअर दृष्टीकोन, प्युअर-क्लास, प्युअर वागणं, प्युअर चारित्र्य. लोकांनी भले तुला मोठं केलं असेल, देवपण दिलं असेल पण तुझ्या वागण्यात कधी 'ऍटीट्युड' नाही आला. शतक पूर्ण केल्यावर बीसी, एमसी हे शब्द कधी तुझ्या तोंडून नाही आले. ज्या क्रिकेटनं तुला सर्व काही दिलं, त्या क्रिकेटला धक्का पोहचेल असं तू कधीच वागला नाहीस. बारमधील मारामारी, पिचवरील लघुशंका, संघातील खेळाडुंसोबतचे तंटे, मॅच रेफरीकडून दंड, बेशिस्तपणासाठी निलंबन या गोष्टींपासून तर तू चार, नव्हे चांगले दहा-बारा हात लांब होतास, म्हणूनच तर लोकांनी तुला देवपण बहाल केलं. कोर्टात भगवद्‍गीतेऐवजी तुझ्या रेकॉर्डवर हात ठेवून जर खरं बोलायला सांगितलं तर लोक जास्त खरं बोलतील. आता तू शेवटचं खेळतो आहेस, त्याच वानखेडेवर जिथं क्रिकेटची सुरुवात केलीस. पूर्ण पाच दिवस स्टेडियम खचाखच भरलेलं असेल आणि सर्वांत शेवटी सगळेजण एकच भावना व्यक्‍त करतील, "आर-पार काळजात का दिलास घाव तू...?" पुढच्या पिढ्या जेव्हा तुझ्या कारकिर्दीचा आढावा घेतील तेव्हा त्यांच्या तोंडून एकच वाक्य निघेल, "ओ माय गॉड, ओ माय गॉड...!"

शेवटी कोल्हापुरी शैलीत एकच वाक्य म्हणेन, "भावा, जिंकलंस तू…"


शेवटची खेळी...


(टिपः- सचिनविषयी जे काही मला माहित होतं, ते लिहिण्याचा एक प्रयत्‍न केला आहे. चूक झाली असेल, किंवा काही राहिलं असेल तर, सचिनप्रेमींनी माफ करावं.)

रितेश कदम
7775924549

No comments:

Post a Comment