Thursday 4 December 2014

द हॉट टेस्ट!

प्रथम ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजेसला भावपूर्ण श्रद्धांजली!

ऑस्ट्रेलिया - तसा हिंसक पशूंसाठी फार प्रसिद्ध. मोठ्याल्या मगरी, विषारी कोळी, अरे हो, शार्कसुद्धा. ह्या सगळ्याच आक्रमक प्रजाती.. बहुदा यांचेच गुण ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी उचललेत. जॉन्सन, पॅटिन्सन, स्टार्क, सिडल, हॅरिस हे सगळेच धष्टपुष्ट आणि ताडामाडासारखे उंच बॉलर्स. तुफानी स्पीड, १४५ च्या वर. घाबरवण्यासाठी बाउंसर, आणि सोबत स्लेजिंगचा (शिव्या देण्यासाठी वापरलेले गोंडस नाव) भडिमार. आता यांच्यासमोर आपले, नुकतेच इंग्लंड दौर्‍यातून शरणागती पत्करून आलेले, वीर रडणार...सॉरी, लढणार आहेत. मागच्या भारत दौर्‍यात ऑस्ट्रेलियाने ४-० असा अनपेक्षित मार खाल्ला होता. त्यामुळे त्या पराभवाची जखम भरून काढण्यासाठी त्यांची फौज नक्कीच आसुसलेली असणार.

आता ऑस्ट्रेलियाला गेल्यावर तिथे काही आपलं टिळा लावुन स्वागत होत नाही. तिथं विमान लँड व्हायचा अवकाश, की लगेच टक्के-टोणपे चालू होतात. दौरा सुरू होण्याआधीच प्रतिस्पर्धी संघाला कसं घाबरवायचं याचा प्लॅन तयार असतो. त्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंटच असतं. "तयार रहा, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ४-० ने मार खाणार," वेल-कम टू ऑस्ट्रेलिया. इति ग्लेन मॅग्राथ. सिडलनेही कोहलीला प्रेक्षकांचे भय दाखवले आहे. बाकिची कसर मिडियावाले भरून काढतात किंवा काढतील.

ऑस्ट्रेलियासाठी निम्मे काम तर त्यांचे बॉलर्सच करतात. ते प्रतिस्पर्ध्याला कधीच जम बसवू देत नाहीत. मागच्या ऍशेस सिरिजमधे इंग्लंड टीमच्या अनेक खेळाडूंना जॉन्सनच्या बाउंसर्सने शेकून काढले होते. त्यातच आपला इंग्लंड दौर्‍याचा अनुभव ताजा आहेच. कोहली, पुजारा, धवन यासकट सर्वच खेळाडूंना आपली ऑफ-स्टंप नक्की कुठे आहे, हे समजण्यातच दौरा संपला. सध्या आपल्या खेळाडूंची विकेट बॉलर्सपेक्षा धसक्यानेच जास्त जाते. ते पुर्वी होतं ना, मुघलांच्या घोडयांना संताजी आणि धनाजी हे पाण्यातही दिसायचे. आणि त्या पाण्यालाही ते जसे घाबरत होते, तशीच अवस्था काही प्रमाणात भारतीय फलंदाजांची झाली आहे. खेळपट्टीवर हिरवळ, आणि फास्ट स्विंग होत असलेला बॉल पाहिला की भारतीय फलंदाज बिथरतात. तीच गत या दौर्‍यातही राहिली तर हा दौरासुद्धा, डोक्यापासून टाचेपर्यंत, कठीण आहे!

मग पर्याय काय, जर मालिकेत चांगलं प्रदर्शन करावयाचे असेल तर? थोडे मेंदूला कष्ट द्यावे लागणार आणि अभ्यास करावा लागणार. दोन सामने आहेत अनुक्रमे ब्रिस्बेन आणि मेलबर्नवर, फास्ट बॉलर्सशी सलगी करणारे पिच. आपल्याकडे वरून आरून, इशांत, आणि उमेश यादव यांच्यासारखे फास्ट बॉलर्स आहेत. जर ब्रिस्बेनवर चार फास्ट बॉलर्स खेळवून थोडी आक्रमकता दाखवली आणि तो सामना अनिर्णित राखता आला, तर त्याचा फायदा ऍडलेड आणि सिडनेवर होईल. कारण, एक तर इथल्या विकेट्स स्पिन बॉलर्सना थोडी 'लाईन' देतात, आणि इतर ठिकाणांपेक्षा आपली इथली कामगिरी तुलनात्मकदृष्टया चांगली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करायची असेल, तर आक्रमक डावपेच हाच सर्वोत्तम उपाय आहे. जरासा ढिलेपणा दाखवला आणि अतिबचावात्मक पवित्रा घेतला तर जो काही 'डिफरन्स' राहतो, त्याचाच उपयोग ऑस्ट्रेलिया मॅच जिंकण्यासाठी करतो. आणि हाच 'डिफरन्स' गेल्या कित्येक मालिकेत आपल्याला 'लई भारी' पडलेला आहे. त्यामुळे धोनी कशी रणनीती आखतो आणि त्याची अंमलबजावणी करतो, यावरच मालिकेतील यश (किंवा 'पराभवाची' तीव्रता) अवलंबून असेल!

No comments:

Post a Comment