Tuesday 1 December 2015

टेस्ट क्रिकेट- वेल-कम टू नाईट क्लब

फ्लड-लाईट्स, पिंक बॉल, टेस्ट क्रिकेटमधील नविन आणि एक्सायटिंग सुरुवात. क्रिकेटला आणखी एक रंगतदार ‘गुलाबी’ मुलामा चढला. Creative thinking and innovative ideas bring energy and along with it development. डे-नाईट टेस्ट ही एक चांगली क्रियेटीव आयडिया आहे. तसं क्रिकेटमधील प्रत्येक नाविन्यपूर्ण गोष्टीचा श्रीगणेशा ऑस्ट्रेलियाच्या पीचवरच होतो. डे-नाईट वन-डे, अल्युमिनियम बॅट, स्टंपमधील कॅमेरा, आणि आता डे-नाईट टेस्ट मॅच. अनेकांना ही आयडिया रुचली, तर काहीजणांना हा टेस्ट क्रिकेटवरती आघात वाटतो. असो.


वन-डे आणि टी-२० या प्रकाराने क्रिकेट जरी व्यापलं असलं, तरी टेस्ट क्रिकेटची आपली एक ओळख आहे, एक वेगळी ‘टेस्ट’ आहे. पण वर्षानुवर्षे या ‘टेस्ट’मधे जास्त व्हरायटी आणि एक्स्परीमेंट झाले नव्हते. तीच ती पोळी-भाजी, वरण-भात अशी ठरलेली थाळी. सात्विक असलं तरी त्यात वेगळेपणा नव्हता. डे-नाईट टेस्ट कदाचित तो आवश्यक असलेला स्पाइस देऊ शकेल. आणि या ‘स्पाइस’मुळे टेस्ट क्रिकेटचा प्रेक्षक वर्ग वाढेल.

डे आणि नाईट टेस्ट या दोन प्रकारामधे मूळ फरक असेल तो म्हणजे खेळाची सुरुवात. डे टेस्ट असेल तर सकाळ-सकाळी नवीन बॉलवर फास्ट बॉलर्सना चांगला स्विंग आणि दमट खेळपट्टीतून थोडी कुमक मिळते. पण एक-दोन तासांनी पीच शुष्क (ड्राय) झाल्यानंतर तेवढा दम राहत नाही.

डे-नाईट मॅचमधे फ्लड-लाईट्समुळे फास्ट बॉलर्सना एक्स्ट्रा स्विंग मिळतो/ मिळत राहील (याचं ठाम टेक्निकल कारण अजून कळलेलं नाही). नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड सामन्यात या गोष्टीचा प्रत्यय आला.

पांढ-या बॉलपेक्षा गुलाबी बॉलचा लॅकर आणि त्या अनुषंगाने शाईन आणि सीम चांगल्या प्रकारे टिकलेली दिसली. याचा थोडा फायदा बॉलर्सना मिळेल.

डे टेस्टमधे जो बरा-वाईट परीणाम पीचवर होतो, तसाच तो डे-नाईटमधेही राहील. राहतो प्रश्न रिव्हर्स-स्विंगचा. कदाचित गुलाबी बॉल पांढ-या बॉलपेक्षा थोडासा जास्त रिव्हर्स होईल. आणखी एक फायदा म्हणजे बॅड लाईटमुळे खेळ वाया जाणार नाही.

या सर्व बाबींचा विचार करता, डे-नाईट टेस्टमुळे बॉलिंग आणि बॅटिंग यामधे एक चांगला बॅलन्स राहील.

पण एक अतिशय महत्वपूर्ण बाब जी या डे-नाईट टेस्टसाठी कदाचित हानीकारक ठरेल, ती म्हणजे ‘संध्याकाळी आणि रात्री पडणारे दव'. या ‘दवा’मुळे बॉलच्या सीमची आणि लेदरची लगेच वाट लागते. त्यामुळे भारतात आणि इतर आशियाई देशात हा प्रयोग थोडा शंकास्पद वाटतो. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका, न्युझिलंड या देशातील हवामान बघता, हा प्रयोग तिथे तरी यशस्वी होण्याची शाश्वती आहे. काही झालं तरी नावं ठेवण्यापेक्षा या नाविन्याचं स्वागत करू आणि टेस्ट क्रिकेटलाही या ‘नाईट क्लब’मधे सामील करून घेऊ.

No comments:

Post a Comment