Friday 11 March 2016

दे घुमाके... दोबारा!

“इसका नतीजा क्या होगा? ऐसा सवाल जब मनमे आता है, तो बॅट्समन हिचकिचा जाता है। और ऐसे हिचकिचानेवाले बॅट्समनको ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट खेलने का कोई अधिकार नही।” ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मॉडिफाय केलेला 'अब तक छप्पन' या सिनेमातील हा डायलॉग. बॉल टप्प्यात आला की घुमवायचा, हा एकच नियम असतो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधे. मारलेला फटका हा फोर किंवा सिक्सच असणार, हाच विचार सतत करायचा असतो. मग त्यासाठी विकेटची आहुती पडली तरी बेहत्तर. तसेही प्रत्येक टीममधे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटला साजेसे ‘युटिलिटी’ (सेमी ऑल-राउंडर) खेळाडू जास्त आहेत. विकेट पडल्या तरी आठ-नऊ नंबरपर्यंत चांगले बॅट्समन असतात, त्यामुळे फटक्यांचा ओघ आणि जोर कमी होऊ द्यायचा नसतो.

ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमुळे फटक्यांच्या व्हरायटीही वाढल्या आहेत. ज्याप्रमाणे जशी फिल्ड तशी बॉलिंग असते, त्याप्रमाणेच जशी फिल्ड तसे फटके, हे समीकरण आहे. जसे की, शॉर्ट थर्ड-मॅन आणि मिड-ऑन असेल तर रिव्हर्स स्वीप. फाइन-लेग रिंगणात असेल, तर स्कूप शॉट. भाई, ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमे रन्स लेनेके लिये ये अलग-अलग पैंत्रे आजमानेही पडते हैं। बिचा-या बॉलर्सकडे या रन्सवर कंट्रोल ठेवण्यासाठी ‘यॉर्कर’ हे एकच हुकमी अवजार सध्या उपलब्ध आहे.

प्रत्येक संघाकडे तीन-चार इम्पॅक्ट प्लेयर्स असतात, ज्यांच्या कामगिरीवर संघाचे बरेचसे यश अवलंबून असते. कोहली, रोहित, मॅक्सवेल, वॉर्नर, गेल, पोलॉर्ड, डिव्हिलियर्स, डुप्लेसिस, कोरे एंडरसन, विल्यमसन, बटलर, मॉर्गन, हे खेळाडू आपापल्या संघासाठी इम्पॅक्ट प्लेयर्स ठरू शकतील.

या ट्वेंटी-ट्वेंटी ने हळू-हळू सर्वत्र आपले पाय पसरायला सुरूवात केली आहे. हॉलंड, अफगाण, नेदरलंड, हाँगकाँग यांसारखे लिंबू-टिंबू संघसुद्धा धडाकेबाज खेळ करू लागले आहेत. वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यापासून भारत, पाक, इंग्लंड, वेस्ट इंडीज, लंका, या सर्वांच्या कपाळावर ‘वर्ल्ड-चॅम्पियन’ हा टिळा लागलेला आहे. म्हणजे प्रत्येकवेळी नवीन चॅम्पियन. पण वर्ल्ड कप “सारखी स्पर्धा” असल्यामुळे प्रत्येक संघ झोकून देऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. परंतू शेवटी कुठे ना कुठे तरी एकापेक्षा दुसरा संघ हा वरचढ असणारच. सध्याचा कल बघता, भारत, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्युझिलंड ह्या चार संघांकडे चॅम्पियन बनण्यासाठीचे सर्व छत्तीस गुण आहेत. आणि अंतिम लढत या चार संघांतच होण्याचे चान्सेस आहेत.

हा फॉरमॅट फास्ट आणि फ्युरियस आहे. हर्षा भोगलेचे एक वाक्य इथे चपखलपणे बसते, “इन टी-ट्वेंटी क्रिकेट, यु काण्ट अव्हॉइड डॅमेज, बट व्हेनेव्हर यु गेट चान्स, यु कॅन मिटिगेट द डॅमेज बाय टेकिंग विकेट्स, बोलिंग डॉट बॉल्स, अँड सेव्हिंग रन्स.” (ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधे तुम्ही नुकसान टाळू शकत नाही, पण शक्य तेवढे कमी करू शकता - विकेट घेऊन किंवा चांगली फिल्डिंग करून.) हा मंत्र जो संघ लक्षात ठेवेल, तो या वर्ल्ड कपमधे सर्वोत्तम कामगिरी करेल. आणि आम्हा क्रिकेट रसिकांनाही सर्व संघांची सर्वोत्तम कामगिरीच बघायची आहे.

अरे, चालू झाला वर्ल्ड कप - १०, ९, ८, ७…………. २, १, लेट्स प्ले फॉर द वर्ल्ड कप...

No comments:

Post a Comment